प्रचाराचे ताबूत थंडावले ; सायंकाळी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:45 AM2019-04-28T00:45:58+5:302019-04-28T00:46:34+5:30
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी घेत जाहीर प्रचारावर अंतिम हात फिरविला. सायंकाळी सहा वाजेनंतर उमेदवारांच्या संपर्क कार्यालयांवर लावण्यात आलेले बॅनर, फलक, झेंडे तातडीने काढून घेण्यात आले.
नाशिक : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी घेत जाहीर प्रचारावर अंतिम हात फिरविला. सायंकाळी सहा वाजेनंतर उमेदवारांच्या संपर्क कार्यालयांवर लावण्यात आलेले बॅनर, फलक, झेंडे तातडीने काढून घेण्यात आले.
दरम्यान, सायंकाळी प्रचाराची सांगता झाल्याने सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच उमेदवारांनी राजकीय डावपेच व व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक भागातील आपल्या हक्काचे मतदार मतदानासाठी बाहेर काढण्याबरोबरच, प्रचारादरम्यान दिसून आलेली राजी-नाराजी काढण्यासाठी व्यक्तिगत गोपनीय गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जारी करण्यात आली असली तरी, काही इच्छुकांनी त्यापूर्वीपासूनच निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रचाराला सुरुवात केली होती.
उन्हामुळे पायी दौऱ्यांपेक्षा गाड्यांचा वापर
नाशिक शहराचे तापमान ४२ अंशांपर्यंत असल्याने दुपारच्या सुमारास कडाक्याचे ऊन होते. त्यामुळे उमेदवारांनी पायी प्रचारफेरी काढण्याऐवजी गाड्यांमधून प्रचार करण्याला प्राधान्य दिले. उन्हामुळे बाजारपेठेत गर्दी कमी होतीच शिवाय सर्वसामान्य नागरिकही बाहेर पडले नसल्याने वाहन रॅलीच्या माध्यमातून मुख्य रस्त्याबरोबरच उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांवरूनदेखील वाहन रॅलीतून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
अन् प्रचारातून झाली सुटका
प्रचार रॅली, पदयात्रा, दुचाकी रॅली, औद्योगिक कंपन्यांना भेटी, समाज, संस्थांच्या बैठका, मंदिर, मशीद, चर्चमध्ये हजेरी लावून उमेदवारांनी पाठिंबा मिळविण्यात चढाओढ केली. गेल्या महिनाभरापासून भर उन्हात घामाघूम झालेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांची सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचारातून सुटका झाली.