प्रचार महागला; नातेवाइकांना पाचारण

By admin | Published: February 13, 2017 12:25 AM2017-02-13T00:25:02+5:302017-02-13T00:25:12+5:30

रिक्षा, मिनी टेम्पोला आला ‘भाव’ : प्रचारपत्रके वाटपाचा दर तीनशे रुपये रोज

Promotions expensive; Calling Relatives | प्रचार महागला; नातेवाइकांना पाचारण

प्रचार महागला; नातेवाइकांना पाचारण

Next

 नाशिक : निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, जेमतेम आठवडा हातात असल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे. यंदाची निवडणूक चांगलीच महागात पडत असल्याच्या प्रतिक्रिया विविध प्रभागांमधील उमेदवारांच्या ‘अर्थ’ विभागप्रमुखांनी व्यक्त केल्या आहेत. प्रचारासाठी लागणाऱ्या कार्यकर्त्यांपासून तर प्रचारपत्रके वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांचेच दर वाढल्याने बहुसंख्य प्रभागातील उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांनाही पाचारण करणे पसंत केले आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्या उमेदवाराच्या घरी एखाद्या सण-उत्सवापेक्षाही मोठा उत्सव पंधरवड्यापर्यंत पहावयास मिळतो. शारीरिक, मानसिक दमछाकीबरोबर आर्थिक हिशेब जुळवतानाही उमेदवारांच्या ‘अर्थ’ जबाबदारी पेलणाऱ्यांच्या नाकीनव येत आहे. एकीकडे वाढलेला प्रचाराचा खर्च तर दुसरीकडे एटीएम, बॅँकांमधून रक्कम काढण्यावर असलेल्या मर्यादांमुळे प्रचाराचा खर्च भागवायचा कसा हा मोठा प्रश्न निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपुढे आहे. यामुळे बहुतांश उमेदवारांनी जवळचे नातेवाईक, मित्र परिवारांच्या ‘एटीएम’चा आधार तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे. कारण निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जवळ गंगाजळी असणे अपरिहार्य आहे; मात्र बॅँकेतून एका दिवसात २४ हजार व एटीएममधून १० हजार रुपये काढण्याची मर्यादा असल्यामुळे उमेदवारांची अडचण होत आहे.
कार्यकर्त्यांच्या भोजनावळीचा एका दिवसाचा खर्च जवळपास पाच ते सात हजारांच्या आसपास होतो. जेवढा मोठा प्रभाग व लोकप्रिय उमेदवार तेवढ्या जास्त कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागते. रोजाने कार्यकर्ते लावून प्रचार करणेदेखील उमेदवाराला कठीण होत असून सकाळ, दुपार आणि रात्रीच्या भोजनावळीचा खर्च उमेदवारांना डोईजड होत आहे. उमेदवारांकडून खर्च जरा जपून करण्याच्या सूचना त्यांच्या ‘अर्थ’ विभागाला देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Promotions expensive; Calling Relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.