मॉलमध्ये प्रवेश हवा असेल तर दाखवावा लागेल वयाचा पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:33+5:302021-08-19T04:20:33+5:30
नाशिक: ब्रेक द चेन अंतर्गत स्वातंत्र्य दिनापासून कोरोना निर्बंधातून बऱ्यापैकी मुक्तता मिळाली आहे. त्याअंतर्गत दोन लस घेतलेल्यांना शॉपिंग मॉलमध्ये ...
नाशिक: ब्रेक द चेन अंतर्गत स्वातंत्र्य दिनापासून कोरोना निर्बंधातून बऱ्यापैकी मुक्तता मिळाली आहे. त्याअंतर्गत दोन लस घेतलेल्यांना शॉपिंग मॉलमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, अठरा वर्षांखालील वयाच्या मुलांचे अद्याप लसीकरण झाले नसल्याने त्यांना शॉपिंग मॉलमध्ये जाताना वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे.
स्वातंत्र्य दिनापासून मॉल्स खुले करण्यात आले असले तरी लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. १८ वर्षांखालील वयोगटातील मुलांचे लसीकरणच अद्याप सुरू नसल्याने त्यांना प्रवेश देताना अनेक अडचणी येत आहेत. मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या किंवा ज्यांसाठी खरेदी करावयाची आहे, असे १८ वर्षांखालील मुलांना प्रवेश नसल्यामुळे पालकांनाही अडचणी येत आहेत. ही अडचण आता दूर झाली आहे.
राज्य शासनाने सुधारित आदेश लागू केले असून यामध्ये आता १८ वर्षांखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाचे पॅन कार्ड, किंवा वयाचा उल्लेख असलेला कोणताही पुरावा सादर केला तरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्य शासनाने दिलेला सुधारित आदेश जिल्ह्यातही जसेच्या तसा लागू करण्यात आलेला आहे.