शहरात मतदान केल्याचा मिळणार पुरावा

By admin | Published: September 14, 2014 12:45 AM2014-09-14T00:45:40+5:302014-09-14T01:00:48+5:30

शहरात मतदान केल्याचा मिळणार पुरावा

Proof of voting in the city | शहरात मतदान केल्याचा मिळणार पुरावा

शहरात मतदान केल्याचा मिळणार पुरावा

Next

 

नाशिक : मतदान यंत्रातील बिघाडाच्या तक्रारी करून आयोगावर पक्षपातीपणाचा होणारा आरोप खोडून काढण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांतील मतदारांना त्यांनी मतदान करताच क्षणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदविलेल्या मताचा दृश्य स्वरूपात पुरावा दिसणार असून, त्यासाठी नाशिक शहरातील तिन्ही शहरी मतदारसंघांची निवड आयोगाने केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्याच्या व त्याचबरोबर अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातील मतदानात हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद पोहोचल्याने न्यायालयानेही आयोगाला गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने मतदान करणाऱ्या मतदाराला त्याने केलेल्या मतदानाचा पुरावा उपलब्ध करून देण्याकामी प्रयत्न करण्यात येऊन त्यातूनच मतदान यंत्रातून मतदाराला त्याच्या मतदानाची चिठ्ठी देण्याचा पद्धती अवलंबिण्यात आली. परंतु मतदान हे गुप्त पद्धतीचे असल्याने त्याचे मतदानाची चिठ्ठी जर मतदाराच्या हातात पडली, तर मतदानाची गोपनियता भंग पावणार असल्याने आयोगाने पद्धतीत बदल करून मतदाराने मतदान करताच त्याने कोणत्या उमेदवाराला मतदान केले हे यंत्रावरील चिठ्ठीत दिसेल व ती चिठ्ठी पुन्हा यंत्राच्या एका कप्प्यात बंदिस्त होणार आहे. या नवीन पद्धतीतून मतदाराला फक्त त्याने योग्य मतदान केल्याची खातरजमा होणार आहे. आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रायोगित तत्त्वावर ही पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातीलही औरंगाबाद, अमरावती, लातूर, नगर व नाशिक अशा बोटावर मोजण्याइतक्या जिल्ह्यात हा प्रयोग होईल.
नाशिक मतदारसंघातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व या तीन मतदारसंघांतील मतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदानाचा पुरावा मिळणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रावर बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट सोबतच प्रिंटर जोडण्यात येणार आहे.
या नवीन पद्धतीचा वापर करण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे कार्यशाळेचे आयोजन करून त्यात निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती व प्रशिक्षण दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या नवीन पद्धतीविषयी मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Proof of voting in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.