शासकीय नियम पाळत शाळेची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:35 PM2020-11-21T23:35:13+5:302020-11-21T23:37:47+5:30
जळगाव नेऊर : कोरोनाच्या दहशतीमुळे अर्ध्याच्यावर शैक्षणिक वर्षं संपत आले; परंतु शिक्षण विभागाने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून ...
जळगाव नेऊर : कोरोनाच्या दहशतीमुळे अर्ध्याच्यावर शैक्षणिक वर्षं संपत आले; परंतु शिक्षण विभागाने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येवला तालुक्यात शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षक, विद्यार्थी, पालक कंटाळले होते. त्यामुळे उत्साह असला तरी कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू होत आहे. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे पाठविल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन यांच्याकडून प्राप्त कोविड-१९ नियमावलींचे पालन होणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा अनेक प्रश्नांमुळे पालकवर्ग चिंतित असला तरी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा हेतूही पालकांचा आहे.
शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाइझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाइझ केले जातील, शिक्षण विभागाचे सर्व नियम पाळून पूर्ण विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येणार आहे.
- एन.आर. दाभाडे, प्राचार्य, जळगाव नेऊर विद्यालय.
गेली आठ महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती; पण शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू होत असल्याने आनंद झाला असून, विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे.
- शरद तिपायले, पालक