ग्रामपंचायतींच्या मालमत्तेची ड्रोनद्वारे होणार मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:18 AM2021-01-05T01:18:01+5:302021-01-05T01:18:40+5:30
ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्तेपासून ते थेट गावातील प्रत्येक नागरिकाच्या नावे असलेल्या जमिनीची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून, त्याची मालमत्ता नावे करण्याच्या केंद्र सरकारच्या सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील दोन तालुक्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे.
नाशिक : ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्तेपासून ते थेट गावातील प्रत्येक नागरिकाच्या नावे असलेल्या जमिनीची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून, त्याची मालमत्ता नावे करण्याच्या केंद्र सरकारच्या सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील दोन तालुक्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे.
देवळा आणि इगतपुरी तालुक्यात ड्रोनद्वारे मोजणीला सुरुवात केल्यानंतर, जिल्ह्यातील प्रत्येक गावात अशा प्रकारची मोजणी करण्यात येणार आहे. जमाबंदी आयुक्तांकडून या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली होती. तथापि, त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, या उपक्रमाला खीळ बसली. मात्र, राज्य सरकारच्या या उपक्रमाची दखल घेण्यात येऊन त्यांनी देशपातळीवर ते राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा, तालुका, गाव पातळीवर प्रत्येक जमिनीची मोजणी आता केली जाणार असून, या जमिनीची मालकी त्या-त्या व्यक्ती, संस्थेच्या नावे केले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रत्येक गावाची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी गाव नकाशा, गावठाणातील जागा, ग्रामपंचायतीच्या मालकिची हद्द व मालकी निश्चित केली जाईल. गाव मोजणी झाल्यानंतर व्यक्ती, संस्थांच्या नावे मालमत्ता पत्र दिले जाणार आहे. देवळा व इगतपुरीतील निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती वगळता अन्य गावांमध्ये ही मोजणी केली जाईल. निवडणुकीनंतर १९ जानेवारीपासून दोन्ही तालुक्यांची मोजणी होईल.
नाशिक जिल्ह्यातील देवळा, इगतपुरी, नाशिक व सिन्नर या चार तालुक्यांची त्यासाठी निवड करण्यात आली असली, तरी प्रायोगिक पातळीवर देवळा व इगतपुरी या दोन तालुक्यांत याची सुरुवात केली जाणार आहे. उत्तराखंडच्या देहरादून येथील एका संस्थेच्या मदतीने हे काम केले जाणार आहे.