‘एसपीव्ही’वगळूनचप्रशासनाला ठराव रवाना
By admin | Published: December 11, 2015 11:54 PM2015-12-11T23:54:30+5:302015-12-11T23:55:45+5:30
स्मार्ट सिटी प्रस्ताव : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
नाशिक : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे सांगत नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यावर महापौरांनी महासभेच्या निर्णयात कोणताही बदल न करता ‘करवाढ’ आणि ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेइकल) वगळून प्रस्ताव प्रशासनाला रवाना केला आहे. ‘एसपीव्ही’वगळून प्रस्ताव प्रशासनाला पाठविण्यात आल्याने दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेत नाशिकचा टिकाव लागण्याची शक्यता मावळली आहे. दि. १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव राज्य शासनाला सादर करावयाचा असल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
दि. २ डिसेंबर रोजी विशेष महासभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील करवाढ आणि ‘एसपीव्ही’ला सदस्यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. भाजपाच्या सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध दर्शवित ‘एसपीव्ही’बद्दल भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. त्यामुळे सभागृहात पुन्हा एकदा भाजपा एकाकी पडली होती. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्ही अर्थात कंपनीकरणामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवरच घाला येणार असल्याची भीती व्यक्त करत त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर सभागृहानेही बग्गा यांच्या सुरात सूर मिसळून कंपनीकरणाचा प्रस्ताव झुगारून लावला.
एसपीव्ही हाच स्मार्ट सिटीचा मूळ गाभा असताना तोच वगळण्यात आल्याने स्मार्ट सिटी अभियानात नाशिकच्या सहभागाची शक्यता धूसर बनली. आयुक्तांनीही एसपीव्हीशिवाय प्रस्तावाला काहीच अर्थ नसल्याचे सांगत एसपीव्हीचा समावेश नसेल तर नाशिकच्या समावेशाबाबत शंका उपस्थित केली होती.