ग्रामपंचायतींच्या निर्मितीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:55 AM2020-02-17T01:55:46+5:302020-02-17T01:56:51+5:30
नाशिक जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
नाशिक : जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
सुरगाणा, बागलाण, कळवण, दिंडोरी या चार तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायतींच्या विभाजनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या ग्रुप ग्रामपंचायतीतून चंद्रपूर, चिंचले, पांगारणे, सोनगीर, उदमाळ या नवीन, तर हट्टी ग्रामपंचायतीतून करवंदे, श्रीभुवन, मोठा माळ या तीन नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यातील दºहाणे ग्रामपंचायतीतून इंदिरानगरची निर्मिती करण्यात येणार आहे. कळवण तालुक्यातील पिंपळे बु.मधून सावरपाडा, मळगाव खु.मधून मळगाव बु; दरेभणगीमधून धनेर दिगर, वाडी बु. मधून एकलहरे, नाळीद ग्रामपंचायतीतून भांडणे (पिंपळे) व इन्शी या दोन ग्रामपंचायतींची तर आंबेवणी ग्रामपंचायतीतून घोडेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात येणार आहे.
अशी होते नवीन ग्रामपंचायत निर्मिती
बिगर आदिवासी तालुक्यात ज्या गावांची लोकसंख्या दोन हजाराच्या वर असेल व आदिवासी तालुक्यातील गावाची लोकसंख्या एक हजार असेल अशा गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत निर्मिती करता येऊ शकते अथवा ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापासून विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती केली जाते.