सिन्नर तालुक्यात टॅँकर मागणीचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:35 PM2018-04-29T22:35:39+5:302018-04-29T22:35:39+5:30
सिन्नर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सिन्नर तालुक्यात तीन गावे व सात वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहेत.
जयप्रकाशनगर, गुळवंच व सुळेवाडी या तीन गावांसह मीरगावच्या ११ वाड्या, निºहाळे धुळवाडची प्रत्येकी एक अशा वाड्यांच्या टॅँकर मागणीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले असून, त्यांना टॅँकर मंजुरीची प्रतीक्षा आहे.
दिवसेंदिवस विहिरी पाझर तलाव, केटीवेअर बंधारे या जलस्रोतांमधील साठा संपुष्टात येत असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणी पुरविण्याची मागणीही वाढू लागली आहे. बारागावपिंप्री, सोनांबे, चंद्रपूर (खापराळे) या तीन गावांसह मनेगावच्या तीन आणि सोनांबेच्या चार वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव सिन्नर पंचायत समितीस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या गावांची आणि वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा पाणी उपलब्धतेचा वास्तव अहवाल अधिकाऱ्यांना तहसील स्तरावर द्यावा लागणार आहे. अपवाद सोडल्यास पूर्व भागातील बहुतेक गावांमध्ये टंचाई वाढत आहे.दोन वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा एप्रिल महिना संपत आल्याने जलस्रोतांमधील पाणीही आटले आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईने डोके वर काढले आहे. तालुक्यातील सध्या धोंडवीरनगर, पिंपरवाडी (यशवंतनगर) या दोन गावांसह दुशिंगपूरच्या तीन आणि मीठसागरेच्या दोन वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दोन टॅँकरच्या माध्यमातून दररोज पाच खेपा टाकल्या जातात.