नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक ‘पीपीपी’वर विकसित करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:59 PM2018-01-31T19:59:30+5:302018-01-31T20:02:39+5:30

दयनीय स्थिती : उत्पन्न निम्म्यावर, खर्च वार्षिक दीड कोटी

 A proposal to develop the Dadasaheb Phalke Memorial in PPP, PPP | नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक ‘पीपीपी’वर विकसित करण्याचा प्रस्ताव

नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक ‘पीपीपी’वर विकसित करण्याचा प्रस्ताव

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेने अठरा वर्षांपूर्वी उभारलेल्या स्मारकाची अतिशय दयनीय स्थितीफाळके स्मारकाची रया गेल्याने पर्यटकांसह नाशिककरांनीही त्याकडे पाठ फिरवली आहे.

नाशिक - चित्रपटमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने अठरा वर्षांपूर्वी उभारलेल्या स्मारकाची अतिशय दयनीय स्थिती बनली आहे. सुरूवातीच्या काळात एक कोटीहून अधिक महसूल देणा-या फाळके स्मारकाचे उत्पन्न ४२ लाखांवर आले असून देखभाल-दुरुस्तीवर मात्र वार्षिक दीड कोटी रुपयांच्या आसपास खर्ची पडत आहेत. फाळके स्मारकाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आयुक्तांनी आता स्मारक पीपीपी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.
सन २००१ मध्ये फाळके स्मारक साकारण्यात आले. सन २००२ पासून ते ख-या अर्थाने पर्यटकांसाठी खुले झाले. पहिल्याच वर्षी फाळके स्मारकापासून महापालिकेला ९२ लाख १२ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले तर देखभालीवर ४३ लाख रुपये खर्च होऊन सुमारे ४९ लाख रुपये नफा झाला. सन २००३-०४ मध्ये विक्रमी १ कोटी ८ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. मात्र, २००४-०५ पासून उत्पन्न घटण्यास सुरूवात झाली. सन २०१६-१७ मध्ये महापालिकेला फाळके स्मारकापासून अवघे ४२ लाख ६३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे तर देखभाल-दुरुस्तीवर तब्बल १ कोटी ५९ लाख रुपये खर्च करावा लागला आहे. फाळके स्मारक खुले झाल्यानंतर पहिली चार वर्षे ते नफ्यात राहिले. सन २००५ मध्ये ९ लाख रुपयांचा तोटा झाला. २००६ मध्ये पुन्हा अल्पसा नफा मिळाला. मात्र, सन २००७-०८ पासून फाळके स्मारकाला ग्रहण लागले असून आजपर्यंत स्मारकापासून उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त होत असल्याचे चित्र आहे. सन २०१०-११ पासून महापालिकेला फाळके स्मारकाच्या देखभाल-दुरुस्तीवरच सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये मोजावे लागत आहे. फाळके स्मारकातील खेळण्या, मनोरंजनाची साधने, लॉन्स, संगीत कारंजा यासह मिनी थिएटर यांची दुर्दशा झालेली आहे. फाळके स्मारकात कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचा-यांच्या वेतनाबाबतचाही वाद सुरू आहे. फाळके स्मारकाची रया गेल्याने पर्यटकांसह नाशिककरांनीही त्याकडे पाठ फिरवली आहे. सद्यस्थितीत फाळके स्मारक हे प्रेमी युुुगुलांचा अड्डा बनले आहे. फाळके स्मारकाला पुनवैभव प्राप्त करून देण्यासाठी आजवर नुसतीच चर्चा झाली परंतु, प्रत्यक्ष कार्यवाही होऊ शकली नाही. मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांनी काही नामवंत कंपन्यांनाही सीएसआर उपक्रमांतर्गत सहकार्य करण्याची विनंती केली होती परंतु, त्यालाही चालना मिळू शकली नाही. आता मनसेची सत्ता खालसा झाल्याने तो विषयही संपला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी फाळके स्मारक पीपीपी तत्वावर विकसित करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून येत्या महासभेत तो मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
पेलिकन पार्कचाही प्रस्ताव
फाळके स्मारकाप्रमाणेच सिडकोतील पेलिकन पार्क येथे उद्यान आणि रविवार कारंजावरील यशवंत मंडईच्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ पीपीपी तत्वावर उभारण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. पेलिकन पार्कबाबत न्यायालयाकडूनही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या महासभेत या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव ठेवण्याचे सूतोवाचही आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केले आहे.

Web Title:  A proposal to develop the Dadasaheb Phalke Memorial in PPP, PPP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.