संरक्षणमंत्र्यांकडे मांडणार द्विलेखा पद्धतीचा प्रस्ताव
By admin | Published: June 18, 2016 10:50 PM2016-06-18T22:50:50+5:302016-06-19T00:47:17+5:30
एम. देवराजा रेड्डी : रेल्वेकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अंमलबजावणी
नाशिक : रेल्वे मंत्रालयाप्रमाणेच संरक्षण मंत्रालयाकडेही द्विलेखा पद्धतीचा प्रस्ताव पुढील महिन्यात मांडणार असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वत: सनदीलेखापाल असल्यामुळे त्यांनी अजमेर व कपूरथळा या स्थानकांवर द्विलेखा पद्धतीचा अवलंब एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतला आहे, अशी माहिती द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. देवराजा रेड्डी यांनी दिली.
सीए इन्स्टिट्यूटच्या नाशिक शाखेने प्रथमच आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर परिषदेचे उद््घाटक म्हणून उपस्थित असलेले रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत इन्स्टिट्यूटकडून अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी केले जाणारे विविध प्रयत्न याविषयी त्यांनी संवाद साधला. यावेळी रेड्डी यांनी रेल्वे मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या द्विलेखा पद्धतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, रेल्वेच्या अंदाजपत्रकात वापरात नसलेल्या मालमत्तांचा विचारच केला जात नाही. त्यामुळे खर्चाचे असंतुलन प्रकर्षाने जाणवते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वत: सनदीलेखापाल असल्याने त्यांनी द्विलेखा पद्धतीचा तत्काळ विचार करत अजमेर, कपूरथळा या स्थानकांवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतला आहे. येत्या १ जुलै रोजी दिल्ली येथे सीए भवनमध्ये होणाऱ्या सनदीलेखापाल दिनाच्या सोहळ्याप्रसंगी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे उपस्थित राहणार असून, त्यांच्यापुढेही द्विलेखा पद्धतीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रफुल्ल छाजेड, नवीन गुप्ता, धीरज खंडेलवाल, नाशिक शाखेचे अध्यक्ष रवि राठी, मंगेश किनारे उपस्थित होते.