दारणातील पंपिंगची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:03 AM2017-11-04T01:03:47+5:302017-11-04T01:03:47+5:30
दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने दारणा धरणातून यंदा ४०० दलघफू ऐवजी ३०० दलघफू पाणी आरक्षणाची केलेली मागणी जलसंपदा विभागाकडून फेटाळून लावली जाण्याची शक्यता असून, गंगापूर धरणातून १०० दलघफू वाढीव आरक्षण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षाकरिता जलसंपदा विभागाकडे ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. त्यात गंगापूर धरणातून ४३०० दलघफू, तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाचा समावेश आहे. सन २०१६-१७ या वर्षात महापालिकेने गंगापूर धरणातून ३९५० दलघफू, तर दारणातून ३०२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. यंदा दारणातून ४०० दलघफू ऐवजी त्यातील १०० दलघफू पाणी आरक्षण गंगापूर धरणातून देण्याचा आग्रह महापालिकेने धरला असला तरी, महापालिकेची मागणी मान्य होण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने दारणा धरणातून पाण्याची अधिकाधिक उचल करता यावी याकरिता दारणा धरणात पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला असून, अमृत योजनेंतर्गत निधीची अपेक्षा करण्यात आली आहे. सन २०१५ मध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी महापालिकेने दारणा धरणातील पाइपलाइन आतपर्यंत नेली होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे २०० दलघफू पाण्याची होणारी उचल ३०० दलघफूवर जाऊन पोहोचली होती. आता दारणा धरणातील ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या पंपिंग स्टेशनची क्षमता १०० दशलक्ष लिटर्स क्षमता करण्याचा प्रस्ताव असून, अमृत योजनेंतर्गत ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. सदर क्षमता वाढल्यास नाशिकरोड विभागाला दारणातून बारमाही पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.