नाशिक शहरात २५ ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन्सचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:20 AM2021-02-26T04:20:19+5:302021-02-26T04:20:19+5:30
शहरातील प्रदूषित हवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण वेगाने वाढत असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश असून त्यासंदर्भात नाशिक महापालिकेने हवा ...
शहरातील प्रदूषित हवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण वेगाने वाढत असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश असून त्यासंदर्भात नाशिक महापालिकेने हवा गुणवत्ता सुधार आराखडा तयार केला तो मंजूर देखील झाला आहे. यातील काही कामे शासनाने पाठवलेल्या वीस कोटी रूपयांच्या निधीतून करण्यात आले असले तरी शहरातील हवा प्रदूषित होऊ नये यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे देखील महापालिकेने ठरवले आहे. त्या आधारे आता इलेक्ट्रिकल चार्चिंग स्टेशनचा विचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या वतीने आरईआयएल या कंपनीला यासंदर्भात काम देण्यात आले असले तरी बीओटी स्वरूपाचे हे काम आहे. ही कंपनी महापालिकेकडून जागा घेणार असून त्याच्या भाड्याच्या बदल्यात महापालिकेला प्रती युनिट वीज दरामागे ठरावीक रक्कम दिली जाणार आहे. नाशिक शहरातील महापालिकेची व्यापारी संकुले, वाहनतळ, विभागीय कार्यालय किंवा अन्य मिळकती ज्या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी प्रशस्त जागा आहे त्याठिकाणी अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. दहा वर्षे कालावधीसाठी हे स्टेशन्स असतील. त्याचा सर्व खर्च कंपनीच करणार असली तरी नाशिक महापालिकेला जागा मोफत द्यावी लागणार आहे.
इन्फो...
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आता माझी वसुंधरा मध्ये..
शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिकल चार्चिंग स्टेशनचा प्रस्ताव आरईआयएल कंपनीने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडे पाठवला होता. मात्र, कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या संचालकांनी त्यास आक्षेप घेतला आणि महापालिकेच्या जागा एखाद्या कंपनीला देण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनी कसा काय घेऊ शकते असा प्रश्न निर्माण केल्यानंतर कंपनीने प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला. आता हा प्रस्ताव माझी वसुंधरा प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे.
कोट...
इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन बाबत संबंधित कंपनीने राज्यात अन्यत्र कोठे काम सुरू केले आहे, त्याची उपयुक्तता किती, महापालिका आणि नागरिकांचा लाभ किती या सर्व मुद्यांची माहिती संकलित केली जात आहे. त्यानंतर त्यावर निर्णय होईल.
- शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण)