मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी महासभेत प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:24 AM2019-06-18T00:24:16+5:302019-06-18T00:24:36+5:30
पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे.
नाशिक : पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे. येत्या महासभेवर चर्चेसाठी तो मांडण्यात आला असून, सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.
शहरात बहुतांशी मॉलमध्ये सशुल्क वाहनतळ आहेत. काही मॉल्समध्ये वाहनतळासाठी एफएसआय माफ करून घेण्यात आला आहे. चटई क्षेत्र मुक्त असलेल्या क्षेत्रात वाहनतळ मोफत न ठेवता त्याचे शुल्क आकारले जाते. मॉलमध्ये शिरतानाच शुल्क भरून घेतल्यानंतर परत जाताना शुल्क भरल्याची पावतीही परत घेतली जात असल्याने हा कर चोरीचा प्रकार असल्याचीदेखील चर्चा आहे. मॉल किंवा तत्सम व्यावसायिक संकुल असेल तर त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांनी पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमीवर किरण गामणे यांनी येत्या गुरुवारी (दि.२०) महासभेत हा प्रस्ताव मांडला आहे. मॉलमध्ये केवळ धनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही जात असतात. त्यामुळे या ठिकाणी शुल्क घेणे बंद करण्यासंदर्भात कार्यवाही करून संबंधित मॉल्सचालकांना तशा नोटिसा बजवाव्या, अशी मागणी गामणे यांनी केली आहे.