इगतपुरीत टॅँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून
By admin | Published: May 22, 2017 01:31 AM2017-05-22T01:31:28+5:302017-05-22T01:31:38+5:30
तालुक्यातील काही वाड्यांचे टॅँकरचे प्रस्ताव इगतपुरीच्या पंचायत समितीत धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेलगाव कुऱ्हे : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून इगतपुरीची ओळख आहे. तालुक्यातील १२९ महसुली गावांपैकी पूर्व भागातील अनेक गावांना पाण्याची टंचाई कायम भेडसावत आहे. आजही काही आदिवासी वाड्यांना दूषित आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे, तर काही वाड्यांचे टॅँकरचे प्रस्ताव इगतपुरीच्या पंचायत समितीत धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी हातपंपावरून पिण्याचे पाणी आणले जाते.
ग्रामीण भागातील महिला दुष्काळी परिस्थितीला मात्र खूप वैतागल्या आहेत. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक व्यक्ती खा३गी पाण्याचे टँकर मागवितात, तर काही शेतकरी आपली शेती वाचविण्यासाठी या खासगी टँकरचा उपयोग करीत असतात. त्यामुळे त्यांच्या पिकांना जीवदान मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो परंतु तो ग्राहकांना परवडणारा नसूनदेखील अनेक जण टँकरलाच पसंती देत आहेत. तालुक्यात दोन महिन्याच्या कालावधीत अंदाजे चारशेच्या आसपास विवाह संपन्न झाले. त्यामध्ये अंदाजे ग्राहकाला एक दिवसाला पिण्याचे पाणी १८०० रुपये टॅँकरप्रमाणे लागतात, तर एका दिवशी अनेक ग्राहकांना लाखो रुपये मोजावे लागतात. लग्नसराई असल्याकारणाने या सोहळ्यासाठी अनेक जण पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवितात. साधारण या टॅँकरसाठी ग्राहकांना सुमारे दोन हजार रुपये टॅँकरधारकांना द्यावे लागतात. तालुक्यातील पाण्याची परिस्थिती पाहता टँकरधारकांना दुष्काळ आता हवाहवासा वाटू लागला आहे.
इगतपुरी तालुक्यात खासगी टँकर २५० ते ३०० च्या आसपास असून, या परिस्थितीत त्यांची चांदी होत आहे.
अनेक पाण्याच्या टॅँकरवर मोबाइल नंबर लिहिलेले असून, ग्राहक पाणी मिळावे यासाठी
सदर मोबाइलवर फोन करताना दिसतात. बऱ्याच गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने खासगी टँकरधारकांना पाचारण केले जाते. साधारण एका टॅँकरची क्षमता १० हजार लिटर एवढी असते .