चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमता वाढीचा प्रस्ताव
By admin | Published: December 31, 2015 10:11 PM2015-12-31T22:11:45+5:302015-12-31T22:14:48+5:30
चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमता वाढीचा प्रस्ताव
देवळा : तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमतेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करून मार्च महिन्याअखेरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा येथे आयोजित जनता दरबारात दिली.
यावेळी तालुक्यातील जनतेने कृषी विभाग, वीज कंपनी, महसूल विभाग आदि विभागांविषयी तक्रारीचा पाढा वाचला. महसूल विभाग, पोलीस ठाणे व जनतेची एक संयुक्तरीत्या गिरणा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, महिला बालकल्याण सभापती उषाताई बच्छाव, सभापती केदा शिरसाठ, उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे उपस्थित होते.
चणकापूर कालव्याची वहनक्षमता वाढविणे, मशाड नाल्याचे पाणी उजव्या कालव्यात टाकणे, रामेश्वर ते झाडीपर्यंतच्या कालव्याच्या कामापैकी ३२ ते ३५ किमीच्या कामाची रद्द झालेली निविदा काढण्यात आली असून, उर्वरित दोन प्रस्तावाना येत्या तीन महिन्याच्या आत मंजुरी मिळवून हाती घेण्यात येणार आहे. आंदोलकर्त्यांनी दहीवडपासून पुढील कालव्याच्या कामास जे अडथळा आणत आहेत त्यांची समजूत काढण्याचे आवाहन यावेळी आमदार अहेर यांनी केले. पाण्यावरून आंदोलनकर्त्यांनी राजकारण करू नये, रामेश्वर धरणावरून कालवा बायपास करण्याची मागणी करून पूर्व व पश्चिम भागातील जनतेत संघर्ष निर्माण करू नये, असेही ते म्हणाले.
गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल यंत्रणा, पोलीस व स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी. नदीला पाणी नसेल तर त्यावेळी नदीपात्रात २४ तास बंदोबंस्त ठेवून वाळू चोरी पूर्णपणे थांबविण्याची सूचना आमदार अहेर यांनी संबंधित विभागाला दिल्या. वाखारी येथे अंगणवाडीसेविका भरती प्रक्रियेत एका महिलेवर अन्याय झाल्याने सदर भरती रद्द करून नवीन भरती करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिला. (वार्ताहर)
महाराजस्व अभियान व विस्तारित समाधान योजना कार्यक्रमांतर्गत आमदार अहेर यांनी देवळा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते.