भूसंपादनाचे प्रस्ताव स्थायीने फेटाळले
By admin | Published: January 8, 2015 12:31 AM2015-01-08T00:31:41+5:302015-01-08T00:32:50+5:30
सदस्य संतप्त : प्रभागांमधील किरकोळ कामेही होत नसल्याच्या तक्रारी; प्रशासनाचे वेधले लक्ष
नाशिक : नगरसेवकांच्या प्रभागांतील किरकोळ कामांसाठी महापालिकेकडे निधी नाही आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली विविध आरक्षणांसाठी भूसंपादनाचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीवर मंजुरीसाठी ठेवले जात असल्याबद्दल समिती सदस्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक आरक्षणासाठीचे भूसंपादन वगळता समितीने सुमारे ७७ कोटी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावले. महापालिकेत कामांच्या फाईलींचा प्रवास लांबत चालल्याबद्दलही सदस्यांनी नाराजीचा सूर लावला.
महापालिका स्थायी समितीच्या सभेत विविध आरक्षणांसह सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त करावयाच्या कामांसाठीचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवले होते. या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. राहुल दिवे यांनी या प्रस्तावांमधील निम्म्याहून अधिक प्रस्ताव हे तातडीचे नाहीत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली भूसंपादनाचे विषय आणून बिल्डरांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही दिवे यांनी केला. शीतल भामरे यांनी कुंभमेळ्याच्या नावाखाली अन्य विकासकामे थांबवून शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रा. कुणाल वाघ यांनीही प्रभागांमध्ये कामे होत नसल्याचे सांगत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेकडे लक्ष वेधले. सचिन मराठे यांनी महापालिकेकडे किरकोळ कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगतात आणि भूसंपादनासाठी एवढे कोट्यवधी रुपये कोठून आणणार, असा सवाल उपस्थित केला. वंदना बिरारी, रंजना भानसी, अर्चना थोरात, सविता काळे या सदस्यांनीही भूसंपादनाच्या प्रस्तावांना कडाडून विरोध दर्शवित आधी प्रभागातील कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली. यावेळी सभापतींनी अत्यावश्यक कामांसाठीचे भूसंपादन वगळता उर्वरित सर्व भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावले आणि सदस्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)