नाशिक महापालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 08:34 PM2018-01-17T20:34:24+5:302018-01-17T20:35:34+5:30
सेना नगरसेवकाची मागणी : कोट्यवधी रुपयांच्या बचतीचा दावा
नाशिक : देशातील विविध शहरांत रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून कोट्यवधी रूपयांची बचत केली जात आहे. नाशिक महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रविण तिदमे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचा प्रस्तावही त्यांनी स्थायी समितीला पाठविला आहे.
तिदमे यांनी निवेदनात म्हटले आहे, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत आणि दुर्दशेबाबत सतत ओरड होत असते. रस्त्यांच्या कामांवर मनपाचे कोट्यवधी रु पये खर्च होतात. रस्ते तयार होऊनही पावसाळयानंतर अनेक रस्त्यांची चाळण होते. पुन्हा दुरु स्तीच्या नावाखाली कोट्यवधी रु पये खर्च केला जातो. सध्या तर मनपा कामांसाठी सल्लागार नेमूनही पैसे खर्च करत आहे. नवी मुंबई महापालिकेने रस्त्याच्या कामात तब्बल ४० कोटी रूपये वाचविले आहेत. मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करीत पालिकेने पाम बीच रस्त्याचे काम केले आहे. सदर रस्ता उखडून परत नवीन करायला ८ ते ९ महिन्यांचा कालावधी गेला असता. मात्र केवळ २ महिन्यात पालिकेने हे काम केले असून त्यामुळे रहदारीला कोणत्याच प्रकारचा खोळंबा आला नाही. सदर तंत्रज्ञान भारतात नवी मुंबई, दिल्ली सारख्या अनेक शहरांत वापरण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेकडून मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीची नाशिक महापालिकेने माहिती घेऊन अभ्यास करावा आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढे रस्ते दुरु स्तींवर होणा-या खर्चात कोट्यवधीची बचत करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रविणतिदमे यांनी केली आहे. प्रविण तिदमे यांनी स्थायी समितीलाही याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैशांची बचत तर होईलच शिवाय रस्त्यांचे आयुर्मान वाढणार आहे. बचतीच्या पैशांतून अधिक रस्त्यांची कामे होतील, असा दावाही तिदमे यांनी केला आहे.
१९ कोटींचे डांबरी रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा येत्या सोमवारी (दि.२२) होणार असून यावेळी सहाही विभागातील डांबरी रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी १९ कोटी १२ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव बांधकाम विभागाने मंजुरीसाठी ठेवले आहेत. सदर प्रस्तावाच्यावेळी तिदमे यांनी मांडलेल्या सूचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीकडून त्याबाबत कितपत गांभीर्याने घेतले जाते, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.
मायक्रो सर्फेसिंगचे फायदे
ग्रीट, सिमेंट, लहान खडीचा वापर करुन मशीनमध्ये मिश्रण केले जाते. हे मिश्रण थंड करु न परत त्याचा पातळ थर मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर पसरवला जातो. सदर मिश्रण डांबराप्रमाणे गरम करावे लागत नसल्याने वायू प्रदूषण होत नाही. रस्त्यावर ओतल्यावर ते अर्धा तासात सुकते. त्यावरु न लगेच वाहतूक चालू केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न येत नाही. पावसाळ्यात पाणी रस्त्यात न मुरल्याने त्याला खड्डे पडण्याची शक्यता कमी होते. यात डांबराचे प्रमाण कमी आहे. तसेच, यामुळे रस्त्यावर वाहने घसरु न पडून अपघाताची शक्यता कमी होते.