महापालिकेच्या बससेवेचा प्रस्ताव थंड बस्त्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:07 AM2018-08-01T00:07:30+5:302018-08-01T00:07:57+5:30
महापालिकेच्या वतीने शहर बससेवेचा प्रस्ताव गेल्या महासभेत सादर न झाल्याने प्रशासनानेदेखील हा प्रस्ताव साईड ट्रॅकला टाकला आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बससेवेचा प्रस्ताव गेल्या महासभेत सादर न झाल्याने प्रशासनानेदेखील
हा प्रस्ताव साईड ट्रॅकला टाकला आहे. महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक चालविण्यासाठी घेण्याबाबत यंदा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला असून, शासनाची तशीच भूमिका असल्याने गेल्या डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला स्वत:ची सेवा सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान, आयुक्तांनी गेल्या महिन्याच्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यासाठी धावपळ सुरू केली होती. क्रिसील कंपनीचा प्रस्ताव बाजूला ठेवून आयुक्तांनी पुढाकार घेत स्मार्ट सिटीसाठी नियुक्त सल्लागार कंपनीकडून अहवाल तयार करून घेतला. तीनशे बसच्या माध्यमातून ही सेवा सुरू करताना सर्व बस खासगीकरणातून प्रतिकिलो मीटर या दराने ठेकेदराला रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे.
इलेक्ट्रिक आणि डिझेल बसचा विचार
सर्व बस इलेक्ट्रिक किंवा निम्या बस डिझेलच्या घेऊन ही सेवा सुरू करण्याचा मानस आहे. गेल्या महिन्याच्या नियमित हा प्रस्ताव आला असता तरी त्यावर विशेष महासभा काढण्याचीच अधिक शक्यता होती. तथापि, करवाढीच्या विषयावरून महासभा गाजली त्यानंतर आयुक्तांनी सादर केलेले विकासकामांचे प्रस्ताव वगळता अन्य सर्व विषय नामंजूर करण्याची भूमिका घेतली. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घाई करणे थांबवले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे.