प्रस्ताव : मुलांची संख्या अल्प असल्याचे दिले कारण १०१ अंगणवाड्यांना लागणार टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:54 AM2018-05-04T01:54:36+5:302018-05-04T01:54:36+5:30
नाशिक : अपुरी पटसंख्या असल्याचे निमित्त करून शहरातील ४१३ पैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
नाशिक : अपुरी पटसंख्या असल्याचे निमित्त करून शहरातील ४१३ पैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने आर्थिक बचतीच्या नावाखाली अनेक प्रकारचे निर्णय घेतले आहेत. तथापि, शैक्षणिक खर्चाला कात्री लावण्याच्या निर्णयावर मात्र तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात मनपाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३७ शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्यास विरोधही केला. शाळा विलीनीकरणामुळे मुलांना दूरच्या शाळेत जावे लागेल, असे मत मांडले जात होते. मात्र आता १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चिमुकले कोठे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ४१३ अंगणवाड्या चालवल्या जातात. त्यात बारा हजार मुले जातात. त्यातील ७६ अंगणवाड्या खासगी जागेत असून उर्वरित महापालिकेच्या जागेत आहेत. यातील मुलांच्या पटसंख्येचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील १११ अंगणवाड्यांमध्ये ४ ते १४ या दरम्यानच बालकांची संख्या आढळली. त्यातील दहा शाळा वगळून आता १०१ अंगणवाड्या बंद केल्या जाणार आहेत. दहा मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करून ती मुले जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असून, त्यांसदर्भातील निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे घेणार आहेत. या निर्णयानंतरच किती अंगणवाड्यांना मुदतवाढ द्यायची यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून त्यामुळेच यंदाच्या जून महिन्यापासून या अंगणवाडी बंद होतात की पुढील वर्षीपासून याबाबत निर्णयाची प्रतीक्षा आहे.