नाशिकमधील पंचवटी भागासाठी काश्यपी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 07:52 PM2018-01-24T19:52:52+5:302018-01-24T19:54:12+5:30
स्थायी समिती सभापती : मनपाच्या अंदाजपत्रकात करणार तरतूद
नाशिक - मुकणेपाठोपाठ आता गंगापूर धरण समुहातील काश्यपी या मध्यम प्रकल्पातून पंचवटी भागासाठी थेट पाईपलाइन टाकण्यासंबंधीचा प्रस्ताव असून त्यासाठी येत्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याबरोबरच शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, येत्या अंदाजपत्रकात नव्या विकासकामांना फारसा वाव नसणार आहे. त्यामुळे, सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वाकडेच भर दिला जाणार असल्याचेही गांगुर्डे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका प्रशासनाकडून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांचे अंदाजपत्रक फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीला सादर होणार आहे. त्यानंतर, फेबु्रवारीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात महासभेला अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली. गांगुर्डे यांनी सांगितले, चालू आर्थिक वर्षात प्रस्तावित करण्यात आलेली अनेक कामे निधीअभावी मार्गी लागू शकली नाहीत. येत्या अंदाजपत्रकातही उत्पन्नाची बाजू लक्षात घेता नवीन कामांना फारसा वाव नाही. त्यामुळे आयुक्तांच्या अंदाजपत्रकात खूप काही भर घातली जाणार नसल्याचेही सभापतींनी स्पष्ट केले. प्रामुख्याने, भविष्यातील शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने काश्यपी प्रकल्पातून पंचवटीतील माथ्यावरच्या भागासाठी थेट पाईपलाइन टाकण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याबरोबरच शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. महापालिकेमार्फत मुकणे धरणातून थेट पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मुकणेपाठोपाठ किकवी धरणातून पाईपलाइन टाकण्याचा प्रस्ताव होता. परंतु, किकवीचा प्रस्ताव रेंगाळला असल्याने काश्यपीकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. काश्यपी या मध्यम प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता १८५२ दलघफू इतकी आहे. त्यातून प्रतिदिन १०० दसलक्षलिटर्स पाणी पुरवठा होईल यादृष्टीने नियोजन आहे. काश्यपीतील पाण्याचा पंचवटीतील मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव या भागाला लाभ होणार असल्याचेही गांगुर्डे यांनी सांगितले. या वर्षात अनेक प्रकल्पांसाठी शासनाकडून सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षाही सभापती गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.
नगरसेवकांना ५० लाखांचा निधी
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांना प्रभागांच्या विकासासाठी प्रत्येकी ५० लाखांच्या निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली. चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखालीच समितीने ४० लाख रुपये नगरसेवक निधी प्रस्तावित केला होता. पुढे महासभेने त्यात ३५ लाखांची भर घालत निधी ७५ लाखांवर नेला होता.