नाशिक शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:37 PM2017-12-06T15:37:28+5:302017-12-06T15:38:27+5:30
आरोग्य समितीची बैठक : ब्लॅकस्पॉटबाबत नागरिकांना पाठविणार पत्र
नाशिक - महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या सभेत संमत करण्यात आला. याचवेळी, शहरात कचऱ्याच्या ब्लॅकस्पॉटसंदर्भात त्या-त्या परिसरातील नागरिकांना पत्र पाठवून कचरा न टाकण्याचे आवाहन सभापतींमार्फत केले जाणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय साहाय्य समितीची सभा सभापती सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, सार्वजनिक शौचालयांतील १९२ सीटस्ची स्वच्छता मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यामार्फत व्यवस्थित केली जात नसल्याने खासगीकरणातून स्वच्छता करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याचबरोबर, गोदावरी नदी संवर्धनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याना तेथून काढून घेऊन त्यांच्या जागेवर आऊटसोर्सिंगने कर्मचारी नियुक्त करण्याचाही ठराव संमत करण्यात आला. यावेळी, कच-याच्या ब्लॅक स्पॉटसंदर्भात चर्चा झाली. ब्लॅकस्पॉटची संख्या कमी करण्यासाठी पुन्हा प्रयत्न न झाल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे, ज्याठिकाणी ब्लॅकस्पॉट असतील तेथील परिसरातील नागरिकांना पत्र पाठवून आवाहन करण्यात येईल. त्यानंतरही ब्लॅकस्पॉट राहत असतील तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला. मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणाºयांवरही कारवाई करण्यासंबंधीची माहिती आरोग्य विभागाकडून मागविली असता त्यांच्याकडून यादीच प्राप्त न झाल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. छाया देवांग यांनी सफाई कामगारांसाठी आवश्यक त्या ठिकाणी शेड बांधण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार, येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. सफाई कर्मचा-यांच्या समान काम वाटपाबाबत नियोजन होत नसल्याबद्दल सदस्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. जुन्या नाशकात बाजारपेठांतील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची मागणी करण्यात आली तसेच गोदावरी, वाघाडी, वालदेवी, नासर्डी या नदी किनारी १५४ निर्माल्य कलश ठेवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली. डीपीरोडला धूर फवारणीसाठी मोठे हॅण्डमशीन तर गल्लीबोळात छोट्या मशिनचा वापर करण्याच्याही सूचना सभापतींनी दिल्या. सभेला उपसभापती योगेश शेवरे, सदस्य छाया देवांग, शांता हिरे, रुपाली निकुळे, अंबादास पगारे आदी उपस्थित होते.