‘त्या’ स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्दचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:53+5:302021-06-10T04:11:53+5:30
उघडकीस आल्यामुळे इंदिरा बचत गटाचा स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुरवठा निरीक्षकाच्या अहवालावरून कळवणच्या तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा ...
उघडकीस आल्यामुळे इंदिरा बचत गटाचा स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुरवठा निरीक्षकाच्या अहवालावरून कळवणच्या तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविला आहे.
दरम्यान कळवणचे पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड यांनी पुणेगाव येथे भेट देऊन तक्रारदार ग्रामस्थांचे जवाब नोंदवून घेतले. धान्य विक्री केल्याचा कबुली जवाब बचत गटाच्या अध्यक्षांनी दिल्याने स्वस्त धान्य दुकानाचे दप्तर कळवणच्या पुरवठा शाखेत जमा करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
कोरोना काळात गोरगरीब आदिवासी बांधवांच्या हाताला काम नसल्याने कुणीही उपाशी राहू नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांसाठी मोफत तांदूळ व गहू वाटप करण्याचा निर्णय घेतला. पुणेगाव येथील इंदिरा महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान चालवित असून त्यांनी शासनाच्या निर्णयाला तिलांजली देऊन मोफत धान्य न देता सरकारी दराने त्याची विक्री केली.
याबाबत धान्य विक्री झाल्याची तक्रार झाल्यानंतर आपली चूक झाल्याचा कबुली जवाब बचत गटाच्या अध्यक्ष व सदस्यांनी ग्रामस्थांना देऊन जून महिन्यात येणारे धान्य मोफत वाटप करून चुकीवर पडदा टाकण्याचा निर्णय ग्रामस्थ व बचत गट यांनी घेतला होता. गावपातळीवर समझोता झाला असतानाच ग्रामस्थांनी घूमजाव केल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
इन्फो
तक्रारीनंतर कारवाई
पुणेगाव येथील एकूण ९२० लाभार्थ्यांसाठी तांदूळ ८.९० क्विंटल व गहू १३.७० क्विंटल, तर अंत्योदय कुटुंबासाठी तांदूळ ६.५० क्विंटल व गहू ९.७० क्विंटल मे २०२१ या महिन्यात मोफत वाटपासाठी आले होते. त्यापैकी २५ मे रोजी १४४ लाभार्थींना मोफतचे धान्य देण्याऐवजी विकत दिल्याची लेखी तक्रार पोलीस पाटील द्वारकानाथ गायकवाड यांनी तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांच्याकडे केल्यामुळे यंत्रणेने कारवाईचे हत्यार उपसले. आता परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.