‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव केंद्र शासनाला रवाना
By admin | Published: December 16, 2015 12:22 AM2015-12-16T00:22:08+5:302015-12-16T00:22:08+5:30
प्रतीक्षा निकालाची : माकपचा ‘एसपीव्ही’ला विरोध कायम
नाशिक : महापौरांनी भाजपा व माकपा वगळता अन्य सर्वपक्षीय गटनेत्यांच्या स्वाक्षरीने एसपीव्हीचा ठराव सशर्त प्रशासनाला सादर केल्यानंतर आयुक्तांनी तातडीने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे रवाना केला. अटी-शर्तींसह सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर आता चॅलेंज स्पर्धेत नाशिक महापालिका उत्तीर्ण होते किंवा नाही, याची प्रतीक्षा नाशिककरांना लागून राहणार आहे. दरम्यान, एकमेव माकपा पक्षाने ‘एसपीव्ही’ला विरोध कायम ठेवला आहे.
सोमवारी वरिष्ठ पातळीवर वेगवान घडामोडी होऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला काही अटी-शर्तींवर मान्यता देण्याचे जाहीर केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावून अटी-शर्तींचा मसुदा तयार केला आणि स्वाक्षऱ्या करून तो प्रशासनाला सोमवारी रात्रीच रवाना केला. त्यानंतर आयुक्तांनी सदर ठरावासह स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाच्या संमतीनंतर केंद्र सरकारकडे रवाना केला. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच माझे काम असल्याने सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव उपसूचना व अटीशर्तींसह केंद्राला सादर केल्यानंतर आता केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. देशभरातून शहरांच्या येणाऱ्या प्रस्तावांची छाननी होऊन पंतप्रधानांकडून दि. २६ जानेवारीला अंतिम निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटीतील एसपीव्हीसंबंधीचा ठराव महापौरांनी सशर्त प्रशासनाला सादर केला; परंतु एकमेव माकपाने संपूर्ण एसपीव्हीलाच आपला विरोध कायम ठेवला आहे. माकपाचे गटनेते तानाजी जायभावे, माजी नगरसेवक वसुधा कराड व नगरसेवक सचिन भोर यांनी पत्रकार परिषद घेऊन एसपीव्हीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. एसपीव्ही म्हणजे महापालिकेची उरलीसुरली स्वायत्तताच घालविण्याचा डाव असल्याचा आरोप जायभावे व कराड यांनी केला. (प्रतिनिधी)