नाशिकमधील दिव्यांगांसाठी मालमत्ता करात महापालिकेकडून सवलतीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 07:01 PM2018-01-24T19:01:45+5:302018-01-24T19:02:35+5:30
शासनाकडे मान्यतेसाठी पाठविणार : पेन्शन योजनेचा प्रस्ताव येत्या महासभेवर
नाशिक - दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे. याशिवाय, दिव्यांगांसाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचा महापालिकेचा विचार असून तसा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.२४) झालेल्या आढावा बैठकीत चालू आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या तरतूदीनुसार नियोजित प्रकल्पांना मार्चअखेर सुरुवात करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी खातेप्रमुखांना दिल्या.
दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या सहा महिन्यात झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी, दिव्यांगांसाठी शहरातील मनपा शाळांमध्ये २३ ठिकाणी संसाधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. शिक्षण विभागाच्यावतीने अपंग खेळाडूंसाठी पॅरा आॅलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. फेबु्रवारीच्या दुस-या आठवड्यात या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी वैद्यकीय विभागाने सहाही विभागात फिरता दवाखाना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (दि.२६) प्रजासत्ताकदिनी महापौरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी सैनिकांप्रमाणेच दिव्यांगांनाही मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अपंगत्वाचे प्रमाणपत्रधारक दिव्यांगांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. तीन दिवसात १८०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी फेब्रुवारीत होणा-या महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. दरम्यान, दिव्यांगांसाठी राखीव निधी आणि अंदाजपत्रकात केलेली तरतूद मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी खातेप्रमुखांना दिल्या. प्रलंबित कामांनाही गति देण्याचे आदेश त्यांनी दिले.
आॅडिओ लायब्ररी उभारणार
शहरातील अंध बांधवांसाठी महापालिकेच्यावतीने आॅडिओ लायब्ररी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्युत विभागामार्फत नोंदणीकृत सामाजिक संस्था व सार्वजनिक वाचनालये यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संबंधित संस्था, वाचनालयांशी महापालिका करार करणार असून मनपा खर्चाने आॅडिओ लायब्ररी उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी संबंधित संस्था व वाचनालयांना जागा उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे.