प्रस्तावाची बोंबाबोंब; टॅँकरचाच अट्टाहास
By admin | Published: May 24, 2016 10:24 PM2016-05-24T22:24:48+5:302016-05-24T23:45:12+5:30
प्रस्तावाची बोंबाबोंब; टॅँकरचाच अट्टाहास
सिन्नर : फेऱ्यांचा आढावा घेताना उघड झाली बाब सिन्नर : पाणीटंचाई आहे म्हणून टॅँकर सुरू करा, अशी बोंबाबोंब करणाऱ्या गावांकडून टॅँकरचा प्रस्ताव पाठविण्यास कमालीची दिरंगाई होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. लोकप्रतिनिधींकडे टॅँकर सुरू करा, असा अट्टाहास करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र प्रस्ताव पाठविण्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे.
आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी तहसीलदार मनोजकुमार खैरनार व गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्यासोबत बैठक घेऊन तालुक्यातील टंचाई स्थितीचा व टॅँकरच्या फेऱ्यांचा आढावा घेतला. टॅँकर सुरू करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांच्या गावांना भेटी देऊन तातडीने टॅँकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कोमलवाडी या ग्रामस्थांची गेल्या महिन्यापासून टॅँकर सुरू करावा, अशी मागणी होती. टॅँकरसाठी या ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ वाजे यांना गावात एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर टॅँकर सुरू करावा यासाठी साकडे घातले होते. त्यावेळी वाजे यांनी तातडीने टॅँकरच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. प्रत्यक्षात महिन्याभराने म्हणजे काल सोमवारी कोमलवाडी ग्रामपंचायतीने टँकर सुरू करावा, असा प्रस्ताव पाठविला. तीच अवस्था कुंदेवाडी गावाची असल्याचेही समोर आले. ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी जोपर्यंत ग्रामपंचायत टॅँकरच्या मागणीचा प्रस्ताव देत नाही तोपर्यंत तहसीलदार व गटविकास अधिकारी त्या गावांना जाऊन पाहणी करू शकत नाही. (वार्ताहर)