प्रस्तावित हॉकर्स झोनला फेरीवाला संघटनांचा विरोध, नाममात्र दरात हॉकर्स परवान्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:59 PM2018-02-01T14:59:27+5:302018-02-01T15:00:08+5:30
संघटनेचे निवेदन : पर्यायी जागांचीही सूचना
नाशिक : शहर फेरीवाला समिती आणि संघटनांना अंधारात ठेवत करण्यात आलेले हॉकर्स झोन रद्द करावे आणि राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार नाममात्र दरात हॉकर्स परवाने मिळावेत, अशी मागणी हॉकर्स व टपरीधारक युनियनने एका निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे, शहरातील सर्व फेरीवाल्यांची व्यवस्था व परवाने येईपर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येऊ नये, युनियनने सुचविलेल्या पर्यायी जागांचा विचार करत प्रायोगिक तत्त्वावर हॉकर्स झोन निश्चित करावे, महापालिकेने सुचविलेली प्रस्तावित भाडेवाढ रद्द करावी, जोपर्यंत पर्यायी जागा व नाममात्र भाडेदराबाबत पुनर्विचार होत नाही तोपर्यंत महासभेने केलेल्या १५ मार्च २०१६च्या ठरावाला स्थगिती द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने मंजूर केलेले धोरण हे फेरीवाला समितीच्या मंजुरीशिवाय सादर करण्यात आले असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांची वर्दळ नसलेल्या जागी दिलेले हॉकर्स झोन रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.
समितीला मुदतवाढ
फेरीवाला समितीमार्फत शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर फेरीवाला समितीची निवड करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी मागील फेरीवाला समितीच्या मुदतवाढीला मान्यता दिलेली आहे. मागील समितीची मुदत तीन वर्षे कालावधीसाठी होती. समितीची मुदत ही १७ जानेवारी २०१७ रोजीच संपुष्टात आलेली आहे.