समृद्धी केंद्र स्थलांतराच्या हालचाली
By Admin | Published: August 20, 2016 12:02 AM2016-08-20T00:02:29+5:302016-08-20T00:15:15+5:30
चाचपणी : मऱ्हळ शिवारातील चार गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव
शैलेश कर्पे सिन्नर
मुंबई - नागपूर या महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे प्रस्तावित असलेले समृद्धी कृषी विकास केंद्र (नोड) गोंदे ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहून स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. एकाच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र संपादित करण्याऐवजी लगतच्या चार गावांचे थोडे-थोडे क्षेत्र घेऊन ‘नोड’ विकसित होऊ शकतो हा विचार पुढे आला आहे. त्यादृष्टीने सिन्नर तालुक्यातील गोंदेऐवजी मऱ्हळ शिवारातील लगतच्या चार गावांमध्ये समृद्धी कृषी विकास केंद्र (नोड) विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून मुंबई-नागपूर या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोंदे येथे शेतकरी मेळावा घेऊन या महामार्गाला प्रखर विरोध केला होता. त्यानंतर शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. आमदार आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे नोडसाठी गोंदे येथील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असल्याचे समोर आले होते. शेतकऱ्यांचा प्रखर विरोध लक्षात घेऊन या महामार्गाच्या कामाला ब्रेक लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे यांनी मऱ्हळ बुद्रूक व मऱ्हळ खुर्द येथील शेतकऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात शेतकऱ्यांनी महामार्गाला जमीन देण्यास कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. रस्त्यासाठी जमिनी देण्यास तयार असल्याचे मऱ्हळ बुद्रूक व खुर्द येथील शेतकऱ्यांनी सांगितले होते. मात्र समृद्धी कृषी विकास केंद्रासाठी जमिनी घेऊ नका, असे शेतकऱ्यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घ्यायचा नाही, असे शासनाचे धोरण असले तरी जमिनी देण्याची शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न सुरू केले आहे. तालुक्यातील पूर्व भागातील अवर्षण ग्रस्त मऱ्हळ शिवारातील चार गावे समृद्धी कृषी विकास केंद्रासाठी ६०० ते ८०० हेक्टर क्षेत्र जमिनी देण्यास तयार झाले तर गोंदेऐवजी मऱ्हळ येथे समृद्धी कृषी विकास केंद्र उभारले जावू शकते, असा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते.