पोलिसांकडून देहविक्रयचा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:28+5:302021-03-01T04:17:28+5:30

नाशिक : विनयनगर येथील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रयचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड ...

Prostitution den destroyed by police | पोलिसांकडून देहविक्रयचा अड्डा उद्ध्वस्त

पोलिसांकडून देहविक्रयचा अड्डा उद्ध्वस्त

Next

नाशिक : विनयनगर येथील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रयचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यामधून देहविक्रयसाठी आणलेल्या १३ महिलांची सुटका केली तसेच अड्डा चालविणाऱ्या संशयित आंटी फिलोमिना शर्मा व तिचा साथीदार अर्जुनसिंग चौहान यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित सराईत फिलोमिना शर्मा या महिलेने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी येथील प्रभूदेवा नावाच्या अपार्टमेंटमध्ये काही महिला व युवतींना राहण्याची व्यवस्था करुन देत त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्रयचा व्यवसाय सुरु केलेला होता. विनयनगर भागातील भारत नगरसमोरील मोकळ्या मैदानामध्ये हा परिसर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागातील नागरिकांकडून सातत्याने पोलीस आयुक्तालयाला तक्रारी प्राप्त होत होत्या. यामुळे गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या संयुक्त पथकांना कारवाईचे आदेश दिले. यावेळी पथकाने प्रभूदेवा अपार्टमेंट गाठून तेथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व सापळा रचला गेला. बनावट ग्राहकाने इशारा देताच दबा धरुन बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी आतमध्ये प्रवेश करत छापा टाकला. यावेळी घटनास्थळावर एकच पळापळ झाली. महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रथम संशयित फिलोमिना हिला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, सचिन सावंत, विशेष शाखेच्या सहायक निरीक्षक माधवी वाघ, महिला पोलीस निलीमा निकम, उन्नती भावे आदींनी या कारवाईत सहभाग घेत तसेच देहविक्रयसाठी असलेल्या एकूण १३ पीडित महिलांना तसेच सहा संशयित ग्राहकांनाही त्वरित पोलीस वाहनात डांबले.

शर्मासह चौहान याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने येत्या ३ तारखेपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित फिलोमिनाविरुद्ध यापूर्वीही देहविक्रय व्यवसाय चालविल्याबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत.

---इन्फो--

स्वतंत्र पथकाद्वारे सापळा रचून पोलिसांचा छापा

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील या भागात काही वर्षांपासून सुरु असलेल्या या देहविक्रयच्या अड्डयावर कारवाई केली जात नव्हती. उपायुक्त चौगुले यांनी याप्रकरणी नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत मध्यवर्ती गुन्हे शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, मध्यवर्ती गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करत त्यांना कारवाईचे आदेश दिले. या कारवाईपासून मुंबई नाका पोलिसांना काही अंतर लांब ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले.

---कोट--

प्रभूदेवा नावाची अपार्टमेंट व त्याला लागून असलेल्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून देहविक्रयचा व्यवसाय सुरु होता. याबाबत स्थानिक नागरिकांकडूनही तक्रारी प्राप्त होत होत्या. येथे आढळलेल्या १३ पीडिता या कोलकात्याच्या रहिवासी असल्याचे त्यांच्याजवळील आधारकार्डवरुन स्पष्ट झाले आहे. २०१९ सालीही येथे छापा टाकून संशयित शर्माविरुध्द कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही वारंवार या जागेवर अशाप्रकारे देहविक्रयचा अड्डा चालविण्याचा प्रयत्न होत असल्याने पोलीस आयुक्तांच्या परवानगीने मनपाकडे पत्रव्यवहार करुन ही जागा कायमस्वरुपी ‘सील’ करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-पौर्णिमा चौगुले-श्रींगी, उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Prostitution den destroyed by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.