संरक्षित मंदिरांचा ठेवा ढासळला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:55 AM2017-08-02T00:55:16+5:302017-08-02T00:55:26+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे
अझहर शेख ।
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे; मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. येथील १६ अत्यंत दुर्मिळ अशा हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.
रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया तर यादवकाळात त्या क्षेत्राच्या राजधानीचा नावलौकिक तीर्थक्षेत्र अंजनेरी गावाने मिळविला आहे. येथील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक पुरातन हेमाडपंती मंदिरे अखेरच्या घटका मोजत आजही इतिहासाचे साक्षीदार म्हणून लक्ष वेधून घेतात; मात्र भारतीय पुरातत्व खात्याचे अद्याप या मंदिरांकडे लक्ष न गेल्यामुळे संरक्षित वारसा म्हणून घोषित केलेल्या व बांधकामाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक समजल्या जाणाºया मंदिरांची पडझड पुरातत्व विभागाच्या संरक्षण कुंपणामध्येच सुरू आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या अंजनेरी गावात प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा नमुना या मंदिरांच्या रुपाने आजही पहावयास मिळतो. पावसाळ्यात निसर्गाची मुक्त हस्ते होणारी सौंदर्याची उधळण आणि धरणीने पांघारलेला हिरवा शालू व अंजनगिरीवर होणारा पावसाच्या सरींचा जलाभिषेक अशा निसर्गरम्या वातावरणात आजच्या तरुणपिढीला जीर्ण व पडझड झालेल्या मंदिरांच्या दुर्मीळ स्थापत्यकलेसोबत ‘सेल्फी’चा मोह आवरणे शक्य होत नाही. पर्यटकांसह तरुणाईचे येथे गर्दी लोटते. आगळ्या वेगळ्या बांधकाम शैलीमधील जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेले अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंती पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.