पर्यावरण रक्षणासाठी वृक्षातच साकारले गणराय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:35 PM2018-09-14T16:35:07+5:302018-09-14T16:35:46+5:30
अंदरसूल : देव दगडात नाही, देव आहे वृक्षात!
येवला : तालुक्यातील अंदरसूल येथील फिरते वाचनालयाचे प्रणेते व सामाजिक कार्यकर्ते संतोष बाळनाथ पुंड या युवकाने ‘मी दगडात नाही, देवळात नाही तर वृक्षात आहे’ असा संदेश देत चक्क वृक्षावरच गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. पुंड यांच्या या आगळ्यावेगळ्या गणरायाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
संतोष पुंड या युवकाकडून कोणतेही शासकीय अनुदान अथवा कोणाचीही मदत न घेता ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश घरोघरी नेऊन पोहोचवत गावकऱ्यांना पुस्तकांचा पुरवठा केला जात आहे. पुरोगामी विचारसरणीचा प्रसार करतानाच शाळा-विद्यालयातही विद्यार्थ्यांशी हितगुज साधत त्याच्याकडून पर्यावरण जागृतीबरोबरच विज्ञान, देशभक्तीचे धडेही देण्याचे काम संतोष करत आला आहे. गणेशोत्सवानिमित्त त्याने गावकºयांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी एका वृक्षालाच त्याला कोणतीही इजा न होता गणपतीचा आकार देत त्यालाच देव बनविले आहे. त्यातून वृक्ष वाचविण्याचा संदेश दिला जात आहे. याशिवाय त्याने पर्यावरणाचा संदेश देणारे काही फलकही त्याठिकाणी लावले आहेत. त्यामुळे गावक-यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. ‘गावची नदी लोकमाता, स्वच्छ ती ठेवयाची, गुरे नाही धुवायची;आघोळ नाही करायची’, ‘झाडे असती मित्र आमुचे; त्याच्याशी दोस्ती करायची, मायेने ती वाढवायची; उगाच नाही तोडायची’, ‘वाहनांचा धूर असूर, बंधने त्यावर घालायची, मस्ती त्याची जिरवायची, हवा शुद्ध राखायची’, ‘प्लॉस्टिकने घातला जगाला विळखा, धोका त्याचा सर्वानी ओळखा’ अशी घोषवाक्यही लक्षवेधक ठरत आहे.