सुरक्षारक्षक-महिला भाविकात हाणामारी
By admin | Published: October 29, 2014 12:07 AM2014-10-29T00:07:49+5:302014-10-29T00:08:02+5:30
सुरक्षारक्षक-महिला भाविकात हाणामारी
त्र्यंबकेश्वर : मंदिरात दर्शन घेण्यावरून वादनाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून महिला सुरक्षारक्षक व महिला भाविक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी घडली.
पुणे येथील कविता प्रल्हाद राठी या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. त्या मंदिरात दर्शन घेत असताना, एका महिला सुरक्षारक्षकाने ‘चला पुढे’ म्हणत त्यांना धक्का दिला. त्याचा राठी यांना राग येऊन या दोघींत वाद झाला व त्याची परिणती एकमेकींना हाणामारी करण्यात झाली. आपण दर्शन घेऊन जात असताना, सुरक्षारक्षकाने आपल्याला धक्काबुक्की केली व आपल्या श्रीमुखात भडकावली, असा आरोप राठी यांनी केला आहे.
मंदिरात महिला भाविक व सुरक्षा कर्मचाऱ्यात वाद झाला असून, याबाबत येत्या ३ नोव्हेंबर रोजी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यावेळी दोन्ही बाजूंना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्त कल्पना शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, आपण स्वत: पुण्यातील एका मंदिराच्या विश्वस्त आहोत. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असून, भाविकांवर अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राठी यांनी केली आहे.