पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला ९४ नगरसेवकांचा विरोध
By admin | Published: January 23, 2015 11:09 PM2015-01-23T23:09:46+5:302015-01-23T23:10:02+5:30
प्रस्तावात त्रुटी : पालिकेमार्फतच काम करण्याची मागणी
नाशिक : डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीकरिता अर्थात पेस्ट कंट्रोलचा तीन वर्षांसाठी साडेसोळा कोटी रुपयांचा ठेका देण्यास नगरसेवकांचा विरोध असतानाही महापौरांनी प्रशासनाच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर आता सभागृहाबाहेर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याविरुद्ध तब्बल ९४ नगरसेवक एकवटले असून, त्यांनी खासगी ठेकेदारास ठेका देण्यास विरोध दर्शविणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. याचबरोबर मागील वर्षी ठेकेदाराच्या मूळ निविदेपेक्षा यंदा अडीचपट रकमेचे प्राकलन ठेवण्यात आल्याने सदस्यांनी संशय व्यक्त केला असून, प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पालिकेनेच सदर काम पालिका आणि संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला तेरा वेळा महासभेच्या मंजुरीविना मुदतवाढीचा प्रस्ताव गाजत असतानाच आयुक्तांनी नव्याने ठेका देण्याचा प्रस्ताव दि. २० जानेवारीला झालेल्या महासभेत मांडला होता. यात तीन वर्षांसाठी निविदा पद्धतीने काम करण्यास प्रशासकीय मंजुरीसाठी १६.५० कोटी रुपयांच्या प्राकलनाचा विषय चर्चेला आला. सदस्यांनी सदर कामाचा पुन्हा ठेका न काढता महापालिकेनेच संबंधित ठेकेदाराकडे असलेले कर्मचारी मानधनावर अथवा किमान वेतनावर पालिकेच्या सेवेत घ्यावे आणि काम करावे, त्यातून महापालिकेची मोठी बचत होणार असल्याचा दावा सदस्यांनी केला होता, परंतु संबंधित कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत घेण्याबाबत शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट करत निविदा पद्धतीनेच ठेका काढण्याला संमती देण्याचे सांगितले होते.
सदस्यांचा विरोध असतानाही महापौरांनी तीन वर्षांसाठी निविदा पद्धतीने ठेका देण्यास संमती दिली आणि कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेण्याबाबत आयुक्तांनी शासनाकडे परवानगी मागावी, अशी सूचना केली होती. महासभेत निर्णय झाल्यानंतर मात्र आता सभागृहाबाहेर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले असून, तब्बल ९४ नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र देत विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी)