व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये फ्री शिप नाकारण्याच्या विरोधात अभाविपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:46 PM2019-07-06T16:46:05+5:302019-07-06T16:46:32+5:30
अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना फ्रीशिप ही नाकारण्यात आली असून महाविद्यालयांमध्ये प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) शनिवारी (दि.6) समाज कल्याण विभागात आंदोलन करून निवेदन दिले
नाशिक :अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना फ्रीशिप ही नाकारण्यात आली असून महाविद्यालयांमध्ये प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) शनिवारी (दि.6) समाज कल्याण विभागात आंदोलन करून निवेदन दिले.
विद्यार्थ्यांना फ्री शीप नाकरल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याचे नमूद करताना या निर्णयामुळे जे विद्यार्थी ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यावर संपूर्ण फी भरण्याची नामुष्की आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये फ्रीशिप मिळाली आहे. त्यांनाही आता फ्री शीपची रक्कमपरत करावी लागणार असून सर्व वर्षांची संपूर्ण फी भरावी लागणार आहे. त् यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आणून देत अभाविपने समाज कल्याण कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त यांना निवेदन दिले होते. परंतु, त्यानंतर १० दिवसांचा कालावधी उलटूनही शासनातर्फे या विषयामध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात शनिवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रादेशिक उपायुक्त उपस्थित नसल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत समाजकल्याण कार्यालय दणाणून सोडले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत समाजकल्याण कार्यालय याविषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल व लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले. मात्रजोपर्यंत विद्यार्थी हिताचा निर्णय होणार नाही. तोपर्यंत विद्यार्थी परिषद हे आंदोलन असेच सुरू ठेवेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नाशिक जिल्हा संयोजक सागर शेलार, नगर सहमंत्री अथर्व कुळकर्णी, राकेश साळुंके, नितीन पाटील, केतन पाराशरे, शुभम पाटील, ऐश्वर्या पाटील, नितीन पाटील, श्रीप्रसाद कानडे, साईराज शिंदे, श्रेया सहाने, स्वराज पाटील आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.