सत्ताधाऱ्यांकडून वक्तव्याचा निषेध : भाजपाकडून सावध पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:19+5:302021-08-25T04:19:19+5:30
------ नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या तोंडी अशा प्रकारची भाषा शोभत नाही ...
------
नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या तोंडी अशा प्रकारची भाषा शोभत नाही व त्यांच्याकडून ही अपेक्षाही नाही. परंतु त्यांच्या वक्तव्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायद्याने त्यांच्यावर कारवाई होईल. काँग्रेस त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते.
- शरद आहेर, शहराध्यक्ष, काॅंग्रेस
------
राणेंचे वक्तव्य महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारे नाही. स्वत: मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे विधान करून पदाची गरिमा घालविली आहे. त्यांच्या वक्तव्यावर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत, आता कायदा त्याचे काम करेल व कठोर कारवाई करेल यात शंकाच नाही.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
-------
लोकशाहीमध्ये मंत्र्यांनी जबाबदारीने वर्तन करणे अभिप्रेत आहे, मात्र राणे यांचे वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. संसदीय प्रणालीचा विचार करून राणे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जावी.
- कॉ. राजू देसले, भाकप, राज्य सचिव
-----
राजकीय विरोध एकवेळ समजू शकतो, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशा प्रकारचे वक्तव्य चुकीचे असून, लोकशाहीला घातक आहे. परंतु अशा प्रकारच्या वक्तव्याने समाजात दुही तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकेफोडी करणेही गैरच आहे.
- तानाजी जायभावे, माकप नेते
----------
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन झालेली आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या पदाचा मान राखला जावा व तो न राखणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी.
- अंकुश पवार, शहराध्यक्ष, मनसे
--------
नारायण राणे अशा प्रकारचे वक्तव्य का करावे लागले, याचा विचार अगोदर करायला हवा. स्वातंत्र्याचा हीरक की अमृत महोत्सव आहे हे मुख्यमंत्र्यांना ठावूक असायला हवे. राणे यांचे वक्तव्याचे भाजप समर्थन करीत नाही. पण मुख्यमंत्र्यांनीदेखील अभ्यास करूनच बोलायला हवे.
- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप