राज्यभरातील नामांकित निवासी इंग्रजी शाळांच्या थकीत अनुदानासाठी संस्थाचालकांचे नाशकात धरणे आंदोलन
By नामदेव भोर | Published: November 9, 2022 01:04 PM2022-11-09T13:04:50+5:302022-11-09T13:18:38+5:30
नामांकित शाळांना तब्बल तीन वर्षांपासून अनुदानाचा पूर्ण निधी प्राप्त झालेला नाही.
नाशिक : आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षणाची योजना सुरू केली आहे. परंतु, शासनाने त्यापोटी देय असलेले पैसेच दिले नसल्याने अखेर निवासी इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेने आंदोलनातमक पवित्रा घेतला असून बुधवारी (दि.९) सकाळपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांना तीन वर्षापासून अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळाली नसल्याने दिवाळीनंतर निवासी शाळा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे नमूद करीत नामांकित शाळांच्या संस्थाचालकांनी दिवाळीनंतर निवासी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे थकीत अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रालयातही पाठुरावा केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी आदिवासी विकास विभागाविरोधातील रोष वक्त करण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बुधवारी अनंत कान्हेरे मैदानाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नामांकित योजनेंतर्गत अनुदान थकीत असलेल्या राज्यभरातील १४८ शाळांचा प्रश्न पेटला असून यात नाशिक जिल्ह्यात १० नामांकित निवासी इंग्रजी शाळांचा समावेश आहे.
नामांकित शाळांना तब्बल तीन वर्षांपासून अनुदानाचा पूर्ण निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संस्थांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संस्थाचालकांची यासंदरअभात नाशिकमध्ये बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, संस्थाचालकांना न्याय मिळाला नसून, पदरी निराशा पडल्याने संस्थाचालक संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. - महेश हिरे, नामांकित शाळा संस्थाचालक संघटना ,नाशिक.