‘मॉब लिचिंग’चा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:14 AM2019-07-13T01:14:17+5:302019-07-13T01:14:36+5:30
देशातील विविध भागांमध्ये जमावाच्या हल्ल्याकडून एखाद्या ठराविक समाजाच्या तरुणांना लक्ष्य केले जात आहे. त्यात तरुणांचा बळी जात आहे. या तंत्राचा निषेध देशभरातून होत आहे. दरम्यान, वडाळागावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाजनंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच देशाची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या समाजकंटकांचा निषेध नोंदविण्यासाठी छोटेखानी पद्धतीने निषेध सभा घेण्यात आली.
नाशिक : देशातील विविध भागांमध्ये जमावाच्या हल्ल्याकडून एखाद्या ठराविक समाजाच्या तरुणांना लक्ष्य केले जात आहे. त्यात तरुणांचा बळी जात आहे. या तंत्राचा निषेध देशभरातून होत आहे. दरम्यान, वडाळागावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाजनंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच देशाची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या समाजकंटकांचा निषेध नोंदविण्यासाठी छोटेखानी पद्धतीने निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी मशिदीचे इमाम मौलाना जुनेद आलम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित मुस्लिमांनी मूक निषेध नोंदविला. देशातील जमाव हल्ले थांबवा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वडाळागावातील गौसिया मशिदीच्या आवारात जुम्माच्या नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. धर्मगुरुंच्या सूचनेप्रमाणे कुणीही घोषणाबाजी न करता केवळ मूक निषेध नोंदविला. जमाव हल्ले करून निष्पाप नागरिकांना मारणाऱ्यांचा सरकारने त्वरित बंदोबस्त करावा त्यांच्याविरु द्ध कायदेशीर कारवाई करावी आणि या देशात कायदा व सलोखा कायमस्वरूपी राखला जावा यासाठी राज्यकर्त्यांनी कठोर पावले उचलावी, अशी मागणी करण्यात आली
दरम्यान, मौलाना जुनेद आलम यांनी प्रार्थना करत भारताच्या प्रगतीसाठी व कायदा व्यवस्था टिकून राहण्यासाठी विशेष दुवा मागितली यावेळी उपस्थितांनी आमीन म्हणून प्रतिसाद दिला.
चौक मंडईतून मोर्चा
‘मॉब लिचिंगविरोधात सोमवारी जुन्या नाशकतील चौक मंडईतून सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दलित-मुस्लीम बांधव जिल्हाभरातून सहभागी होणार आहेत. मोर्चाचे आयोजन मुस्लीम दलित संघर्ष समितीने केले आहे.