आमदारांच्या घरांवर आंदोलकांची धडक

By admin | Published: November 3, 2015 11:19 PM2015-11-03T23:19:24+5:302015-11-03T23:21:54+5:30

पाणीप्रश्नी सर्वपक्ष एकवटले : सानप, फरांदेंकडे घंटानाद, सीमा हिरेंकडे चहापान

The protesters hit the MLA's house | आमदारांच्या घरांवर आंदोलकांची धडक

आमदारांच्या घरांवर आंदोलकांची धडक

Next

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत सर्वपक्ष एकवटले असताना भाजपा आमदारांनी सोईस्कररीत्या मौन बाळगल्याने त्यांना ‘जागते’ करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने शहरातील तीनही भाजपा आमदारांच्या निवासस्थानी धडक मारली. आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या घरासमोर घंटानाद करीत आंदोलकांनी घोषणाबाजी केली, तर आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोर घंटानाद होण्यापूर्वीच हिरे यांनी आंदोलकांना सामोरे जात आपणही नाशिककरांबरोबरच असल्याची नि:संदिग्ध ग्वाही दिली. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बुधवारी शिष्टमंडळ घेऊन जाण्याचेही स्पष्ट केले.
जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा पेटला असताना स्थानिक सत्ताधारी आमदार मात्र मौन बाळगून असल्याने त्यांना जागे करण्यासाठी आणि पाणीप्रश्नाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी भाजपावगळता सर्वपक्षीय कृती समितीने तीनही आमदारांच्या घरांसमोर घंटानाद आंदोलन करण्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी पुन्हा एकदा महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत प्रारंभी पंचवटीत पूर्व विभागाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या कृष्णनगर येथील निवासस्थानाकडे कूच केले. सानप यांच्या निवासस्थानवजा संपर्क कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी घंटानाद करीत प्रचंड घोषणाबाजी केली. ‘नाशिकचे पाणी पळविणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो’, ‘भाजपा सरकार हाय हाय’, ‘मुख्यमंत्री-पालकमंत्री हाय हाय’, ‘जागे व्हा, आमदारसाहेब जागे व्हा’ या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सानप मात्र निवासस्थानी उपस्थित नव्हते.

हिरे यांनी साधले टायमिंग

सीमा हिरे यांनी स्थानिक अन्य भाजपा आमदारांच्या भूमिकेला छेद देत यापूर्वीही मुकणे पाणीप्रश्नी टायमिंग साधले होते. फरांदे व सानप हे दोघे मुकणे पाणीप्रश्नी वेगळी भूमिका मांडत असताना हिरे यांनी प्रारंभापासूनच मुकणे प्रकल्पाचे समर्थन केले होते. आताही पाणीप्रश्न पेटला असताना फरांदे व सानप यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही परंतु आमदार सीमा हिरे यांनी घरासमोर घंटा वाजण्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करत पुन्हा एकदा टायमिंग साधले. यावेळी आंदोलकांनीही हिरे या एकमेव आमदार नाशिककरांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले आणि सरकारदरबारी नाशिककरांची वकिली करण्याची विनंती केली.

आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

आमदार बाळासाहेब सानप हे निवासस्थानी उपस्थित नव्हते, तर आमदार फरांदे या अद्याप विदेश दौऱ्यावरून परतल्या नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांना सामोरे जात आपली भूमिका स्पष्ट केली. हिरे यांनी सांगितले, पाणीप्रश्नी मी नाशिककरां- सोबतच असून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. बुधवारी (दि. ४) सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती कथन केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे हक्काचे पाणी बाहेर जाऊ दिले जाणार नसल्याची ग्वाही देतानाच हिरे यांनी रामकुंडात ठाण मांडून आंदोलन करण्याची तयारीही दर्शविली.

Web Title: The protesters hit the MLA's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.