जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलकांनी सोडली शिदोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:40 AM2020-12-04T04:40:55+5:302020-12-04T04:40:55+5:30
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि.३) सायंकाळी शिदोरी सोडून आत्मक्लेश आंदोलन केले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने आणलेल्या ...
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि.३) सायंकाळी शिदोरी सोडून आत्मक्लेश आंदोलन केले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात दिल्लीत होत असललेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
नाशिक शहरात गुरुवारी (दि.३) दिवसभर विविध शेतकरी, सामाजिक, राजकीय व सेवाभावी संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेकतरी व कृषी सुधार विधेयकांना विरोध करीत आंदोलने केल्यानंतर सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर शिदोरी सोडून सायंकाळचे जेवण केले. त्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जागर गोंधळ आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत या आंदोलनात सहभाग घेतला. स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, सुधाकर मोगल, राजू शिरसाठ, परशराम शिंदे, सोमनाथ बोराडे, निवृत्ती पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
(फोटो-०३पीएचडीसी८७)