अंशदायी पेन्शन योजनेचा काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:55 PM2019-09-06T15:55:15+5:302019-09-06T15:55:30+5:30
इगतपुरी तालुका : मागण्या मान्य न झाल्यास संप
इगतपुरी : शिक्षकदिनी महाराष्ट्र राज्य पेन्शन हक्क संघटनेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक व कर्मचारी संघटनांनी अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचा काळी फीत लावून निषेध नोंदविला. मयत कर्मचार्यांचे कुटूंबिय सरकारी अनास्थेचे बळी ठरत असतांना त्यांना सरकारी सहाय्य मिळत नसेल तर शिक्षक दिन साजरा करण्यात काय अर्थ, असा सवाल यावेळी शिक्षकांनी उपस्थित केला.
सरकारी सेवेत कर्तव्य बजावत असतांना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सरकारने वा-यावर सोडले असुन अशा हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांवर मोलमजुरी करण्याची व उपासमारीची वेळ आलेली आहे शासनाने तात्काळ प्रभावाने मयत कर्मचार्यांच्या कुटूंबियांना फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युईटी तसेच सर्व कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करावी व बक्षी समितीच्या अहवालाप्रमाणे केंद्राच्या धर्तीवर सर्व भत्ते कर्मचा-यांना मिळावेत अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. शासनाच्या अंशदायी पेन्शन योजनेचा निषेध म्हणून शिक्षकदिनी तालुक्यातील सर्व कर्मचा-यांनी काळी फीत लावुन लक्ष वेधले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास ११ सप्टेंबरपासुन बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.
अन्यथा कर्मचारी बेमुदत संपावर
शिक्षकदिनी आंदोलन करावे लागते हे खेदजनक आहे. लक्षवेधी दिनाची दखल घेवुन सरकारने मयत कर्मचाºयांच्या कुटूंबियांना तात्काळ फॅमिली पेन्शन द्यावी अन्यथा कर्मचारी बेमुदत संपावर जातील.
- वैभव गगे, तालुकाध्यक्ष, पेन्शन हक्क संघटन