विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्टी बांधून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:39 AM2019-09-15T00:39:40+5:302019-09-15T00:40:06+5:30
नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत विरोधी पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून हातात वेगवेगळे मजकूर लिहिलेले फलक पकडून मौनव्रत पाळून निषेध आंदोलन केले.
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत विरोधी पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून हातात वेगवेगळे मजकूर लिहिलेले फलक पकडून मौनव्रत पाळून निषेध आंदोलन केले.
नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी ११ वाजता जेलरोड इंगळेनगर येथील बॅँकेच्या सभागृहात बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या पहिल्याच विषयावर माजी नगरसेवक अॅड. सुनील बोराडे यांनी इतिवृत्ताच्या शेवटी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही नसल्याने ते बेकायदेशीर असून मंजूर करू नये, अशी मागणी केली. मात्र इतिवृत्ताच्या शेवटी सही असे लिहिले असून त्यालाच सही संबोधले जाते, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रकाश गोहाड यांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, गोहाड यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या ठरावावर सूचक म्हणून माजी नगरसेवक दिलीप दातीर यांची स्वाक्षरी आहे, मात्र ते सभेलाच उपस्थित नव्हते. कामकाजाबद्दल मते मांडली, वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून सभासदत्व रद्द करण्याचा पडलेला पायंडा चुकीचा आहे असे मत ज्येष्ठ सभासद पां.भा. करंजकर, अजित गायकवाड, जगन गवळी आदींनी व्यक्त केले. याबाबत बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला नसून सर्वसाधारण सभेने घेतला आहे, याबाबत सहकार आयुक्तांकडे सुनावणी होऊन बॅँकेने व गोहाड यांनी भूमिका मांडली असल्याचे स्पष्ट केले.
नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पंतप्रधान आवास योजना बॅँकेमार्फत सुरू करावी, मयत कर्जदारांवरील कर्ज रकमेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, नासाकाचे माजी अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांनी खासगी बॅँकेत ठेवी ठेवू नका अशी सूचना केली. यावेळी नारायण नागरे, रमेश औटे, भास्कर गोडसे आदी सभासदांनी सूचना मांडल्या.
यावेळी बॅँकेचे ज्येष्ठ सभासद तानाजी भोर यांनी आंतरराष्टÑीय धावण्याच्या व चालण्याच्या स्पर्धेत तीन ब्रांझ पदक मिळविल्याबद्दल बॅँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पहिल्या एक-दोन विषयांवर चर्चा करण्यात आल्यानंतर सर्व विषयांना वाचून मंजुरी देण्यात आली. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देत सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेला उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे, ज्येष्ठ नगरसेवक निवृत्ती अरिंगळे, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, जगन आगळे, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, वसंत अरिंगळे, भाऊसाहेब पाळदे, प्रकाश घुगे, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, अरुण जाधव, रमेश धोंगडे, रामदास सदाफुले, श्यामशेठ चाफळकर, कमल आढाव, सुनील महाले यांच्यासह सभासद अॅड. गोरखनाथ बलकवडे, विष्णुपंत गायखे, राजू घोलप, सुदाम ताजनपुरे, नगरसेवक बाजीराव भागवत, अंबादास पगारे आदींसह सभासद उपस्थित होते.
मौनव्रत पाळून निषेध
सभा सुरू होताच सत्तारूढ संचालक मंडळाच्या प्रतिस्पर्धी पॅनलचे शिरीष लवटे, चंद्रकांत विसपुते, अतुल धोंगडे, नितीन चिडे, अतुल धनवटे, रमेश पाळदे, भीमचंद चंद्रमोरे, कृष्णा लवटे, तौफिक खान, सागर भोर, गौरव विसपुते आदींनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ‘सन्माननीय सभासद बॅँक वाचवा, जागृत रहा, बॅँकेचे मुख्य कार्यालय तोट्यात का?, पोटनियम लादून सभासदांना निवडणुकीपासून वंचित करण्याचा घाट, बॅँकेची मनमानी चालणार किती दिवस’ अशा मजकुराचे फलक हातात पकडून मौनव्रत पाळून निषेध आंदोलन केले.