शिक्षकांवरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:27 AM2019-08-28T00:27:33+5:302019-08-28T00:28:52+5:30
मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहे.
नाशिक : मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहे. नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) हुतात्मा स्मारकाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुतळा जाळून घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलकांपैकी चौघांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे गेल्या १४ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांविषयी ठोस आश्वासन न दिल्याने सोमवारी संघटनेने आक्रमक पवित्रा धारण केला. १०० टक्के अनुदानाशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देत शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’कडे मोर्चा वळविला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले असता शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. आझाद मैदानात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीमार केला. या घटनेचा राज्यभरात निषेध होत असताना पोलिसांनी शिक्षकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नाशिकमध्येही मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करू न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांपैकी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष समाधान बागुल, राज्य सदस्य राकेश पवार, राम सूर्यवंशी व सदाशिव गणगे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.