कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:53 AM2019-08-31T00:53:46+5:302019-08-31T00:54:05+5:30
रहिवासाच्या दृष्टीने शहर आदर्शवत राखणे हेच मोठे कार्य असून, नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
नाशिक : रहिवासाच्या दृष्टीने शहर आदर्शवत राखणे हेच मोठे कार्य असून, नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे आणि हिमगौरी आडके यांना कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने नार्इ$सच्या सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दुर्दैवाने समाजातील केवळ वाईट बाबीच सातत्याने पुढे येत असल्याने वाईटच अधिक घडत आहे, असाच सर्वांचा समज होऊ लागला आहे. परंतु, तशी वस्तुस्थिती नाही, हे समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर गांगुर्डे, मुर्तडक व आडके यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात मावळते अध्यक्ष सुनील भायभंग यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील आढावा घेऊन सूत्रे नूतन अध्यक्ष हेमंत राठी व त्यांच्या कार्यकारिणीकडे सोपवित असल्याचे सांगितले. परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी निवडीच्या प्रक्रियेचे विवेचन केले.
सूत्रसंचालन आशिष कटारिया यांनी केले तर पुरस्कारार्थींचा परिचय सचिन अहिरराव यांनी करून दिला. यावेळी माजी अध्यक्ष विक्रम सारडा, जितूभाई ठक्कर, संजीव नारंग, दिग्विजय कपाडिया, स्थायी समितीचे विद्यमान सभापती उद्धव निमसे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार वैशाली बालाजीवाले आदी उपस्थित होते.
आहे ते राखण्याला प्राधान्य
काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी विकास म्हणून बघितल्या जात होत्या, त्या सोडून माणसं पुन्हा निसर्गाकडे आणि नैसर्गिक बाबींकडे वळत आहेत. म्हणजेच त्यावेळी ज्याला आपण विकास म्हणत होतो, तो विकास नव्हता हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. नाशिकमध्ये अनेक चांगल्या बाबी असून, त्या कायम राखण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.
नूतन अध्यक्षपदी हेमंत राठी
नाशिक सिटीझन्स फोरमच्या आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी आज नूतन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ उद्योजक आणि महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी पदभार स्वीकारला. नूतन कार्यकारिणीत त्यांच्यासमवेत उपाध्यक्षपदी संजीव बाफना, खजिनदारपदी आशिष कटारिया तर कार्यकारिणीत नरेंद्र बिरार, अविनाश पाटील, विक्रम कपाडिया, संदीप सोनार यांचा समावेश असून, या सर्वांनी सूत्रे स्वीकारली.
समाजात सर्वच काही वाईट चालले आहे असे मुळीच नाही. चांगले म्हणजे पुण्याचे काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी जरी असले तरी पुण्याचे वजन अधिक असल्यामुळे समाजात समतोल साधला जातो.
- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी