पाच महंताई प्रदान
By admin | Published: September 7, 2015 10:47 PM2015-09-07T22:47:01+5:302015-09-07T22:48:22+5:30
आज दोन समारंभ : साधू-महंतांकडून प्रक्रियेबाबत गोपनीयता
नाशिक : कुंभमेळ्यातील महंताईच्या प्रक्रियेला रविवारपासून प्रारंभ झाला असून, साधुग्राममध्ये आतापर्यंत पाच महंताई प्रदान करण्यात आल्या आहेत, तर उद्या (दि. ८) आणखी दोन समारंभ होणार आहेत. तथापि, सध्याच्या तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंत आता ताकही फुंकून पीत असून, या प्रक्रियेबाबतही साधू-महंत प्रचंड गोपनीयता बाळगत आहेत.
शक्यतो कुंभमेळ्यातच महंताईची प्रक्रिया होते. रिक्त झालेल्या खालशांच्या श्री महंतपदी साधूंची नियुक्ती केली जाते. वैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांमध्ये सध्या ८० महंतपदे रिक्त असून, या सर्वांची महंताई होणे अपेक्षित होते; मात्र महंताईशी संबंधित काही बाबींवरून वादविवाद सुरू झाल्याने कुंभमेळ्याच्या प्रथम शाहीस्नानानंतर लगेच सुरू होणारी ही प्रक्रिया लांबली. वादावर पडदा पडून ही प्रक्रिया आता सुरू झाली खरी; मात्र साधुग्राममधील एकूणच तणावपूर्ण वातावरण पाहता, साधू-महंत महंताईबाबतही अत्यंत गोपनीयता बाळगत आहेत. सदर प्रक्रिया ही आखाड्यांतील नियमित प्रक्रिया असल्याचे सांगत बहुतांश प्रमुख महंतांकडून याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला जात आहे. महंताईच्या प्रक्रियेत होणाऱ्या अर्थव्यवहारावरूनही साधुग्राममध्ये प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, आधीच वातावरण बिघडलेले असल्याने त्यात आणखी भर नको, असा विचार करीत अनेक जण गप्प राहणेच पसंत करीत आहेत. दरम्यान, महंताई ही जर साधूंमधील नियमित प्रक्रिया असेल, तर तिच्याविषयी एवढी लपवाछपवी कशासाठी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
चादर चतु:संप्रदायाची
तिन्हींपैकी कोणत्याही आखाड्यात महंताईचा समारंभ असला, तरी महंताईची लाल चादर ही चतु:संप्रदायातूनच पाठवली जाते. प्रत्येक महंताई कार्यक्रमात चतु:संप्रदायातून नवनियुक्त महंतांना चादर पांघरण्यासाठी खास प्रतिनिधी रवाना केला जातो. फक्त कुंभमेळ्यातच प्रथम शाहीस्नान ते तृतीय शाहीस्नानाच्या दरम्यान ही प्रक्रिया होते. सध्या तिन्ही आखाड्यांत ८० पदे रिक्त असली, तरी या कुंभमेळ्यात किती महंताई होतील, याचा अंदाज लावता येणार नाही, असे चतु:संप्रदायाचे श्री महंत स्वामी फुलडोल बिहारीदास यांनी सांगितले.
वैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांमध्ये सध्या ८० महंतपदे रिक्त असून, या सर्वांची महंताई होणे अपेक्षित होते; मात्र महंताईशी संबंधित काही बाबींवरून वादविवाद सुरू झाल्याने कुंभमेळ्याच्या प्रथम शाहीस्नानानंतर लगेच सुरू होणारी ही प्रक्रिया लांबली होती.
कार्यक्रम असे..
साधुग्राममध्ये रविवारी दोन महंताई कार्यक्रम झाले. त्यांत निर्मोही आखाड्याचे हरियाणातील भिवानीचे महंत धरमदास व पंजाबच्या ध्यानपूरमधील श्रीरामनगर खालशाचे रामदासजी यांना महंताई प्रदान करण्यात आली. सोमवारी दिगंबर आखाड्यात दोन, तर निर्वाणी आखाड्यात एक महंताई झाल्याचे कळते. त्यांत दिगंबर आखाड्याच्या काशीच्या कामधेनू, रामजानकीनगर खालशाच्या श्री महंतपदी रामदास त्यागी, तर उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रामधाम विठ्ठर खालशाच्या श्री महंतपदी अवधकिशोरदास यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तिन्ही आखाड्यांतील साधू-महंत उपस्थित होते. निर्वाणी आखाड्याच्या लालतुरंगी खालशातही महंताई झाल्याचे कळते. उद्या (दि. ८) निर्मोही आखाड्यातील श्री पंच हरव्याषी संतोषी खालशाच्या महंतपदी वासुदेवजी यांच्या, तर निर्वाणी आखाड्यातील राजस्थानातील श्रीरामधाम आश्रमाचे श्री बजरंगाचार्याजी महाराज यांच्या महंताईचा कार्यक्रम होणार आहे.