जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:19+5:302021-03-15T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
नजीकच्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शक्यतो सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात महानगरासह सर्व कापड व इतर जीवनावश्यक पुरवठा दुकानदार, मेडिकल स्टाेअर, हॉटेल मालक व त्यांचे कर्मचारी, दूधवाला, घरकाम मोलकरीण, टपरीवाले, हातगाडी वर वस्तू विकणारे, भाजीपाला व्यवस्थापक, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांची दर आठवड्याला कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोखीमग्रस्त सर्व घटकांनी कोरोना लसीकरण आपापल्या सोयीनुसार नजीकच्या केंद्रावर करून घेण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाला तत्काळ माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय कुटुंबातील व्यक्तींची व दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची खरी माहिती पुरविणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यावसायिक गटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून कोणत्या व्यावसायिकांचे लसीकरण करायचे त्याबाबत स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याशिवाय घरगुती सेवा पुरवणाऱ्यांपैकी दूध घरपोच पोहोचवणारे दूध विक्रेते, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी, घरगुती नोकर, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य कर्मचारी, यांचा त्यात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इन्फो
खासगी दवाखान्यांनाही निर्देश
खासगी दवाखान्यांनी सर्व संशयित रुग्णांची माहिती प्रशासनास तत्काळ द्यावी व चाचणीबाबत तपासणीचा आग्रह करण्यात आला आहेे. केवळ एचआरसीटी तपासणी करून सीटी स्कोअर वाढला आहे म्हणून उपचार करत शासनाची दिशाभूल करू नये. त्यामुळे संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह असला तर त्याच्या सहवासातील व्यक्ती, संबंधित व्यक्ती प्रसार करणे सुरूच राहणार असल्याने तसे करणे टाळावे, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.