मालेगावला सात महिन्यांनंतर मिळाले प्रांत
By admin | Published: October 1, 2015 12:08 AM2015-10-01T00:08:19+5:302015-10-01T00:08:54+5:30
मालेगावला सात महिन्यांनंतर मिळाले प्रांत
मालेगाव : येथील प्रांत तथा उपविभागीय कार्यालयाला सात महिन्यानंतर नियमित प्रांताधिकारी मिळाले असून, प्रांताधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाने मंगळवारी सहा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांची मालेगाव उपविभागीय अधिकारी पदी बदली केली असून, त्यांच्या जागी बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
येथील प्रांत संदीप पाटील यांना २५ फेब्रुवारी २०१५ ला जमिनीचा बिनशेती परवाना देण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सव्वा दोन लाख रुपये लाच घेतांना छापा टाकुन पकडले होते. यावेळी दोन कर्मचाऱ्यांना ही अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून येथील उपविभागीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभाग चांदवडचे उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे होता.
त्यातच ६ आॅगस्ट रोजी येथील अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी ५० लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर ८ आॅगस्टला तहसीलच्या रायजादे व शिंदे या दोन कर्मचाऱ्यांना लाच मागीतल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे महसुल विभागाची लक्तरे वेशीवर टांगले गेली आहेत.
तेव्हापासून अपर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भानुदास पालवे यांच्याकडे आहे. त्यात गेल्या दहा दिवसांपासून तहसीलदार दीपक पाटील रजेवर आहेत त्यामुळे त्यांचाही अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार गिरीष वाखारे यांच्याकडे आहे. त्यामुळे मालेगाव महसूल कारभार प्रभारींवर सुरु असतांना अजय मोरे यांची प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने महसुलला अधिकारी गवसल्याची चर्चा रंगली आहे. अजय मोरे यांनी मालेगावी यापुर्वी तीन वर्ष प्रांतअधिकारी म्हणुन काम केलेले असल्याने लोकांना त्यांच्या कामाची पद्धत माहीत असून लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)