प्रांत मुकेश भोगे यांची मुंबईला बदली
By admin | Published: September 2, 2016 10:56 PM2016-09-02T22:56:07+5:302016-09-02T22:56:23+5:30
उदय किसवे दिंडोरीचे नवे प्रांत
नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरीचे प्रांत मुकेश भोगे यांची मुंबई येथील अंधेरी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी उप जिल्हाधिकारी उदय किसवे यांची दिंडोरी प्रांत म्हणून बदली झाली आहे.
गत महिन्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने काढले होते. त्यात तहसीलदार, प्रांत व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यात विविध भागांत बदल्या करण्यात आल्या होत्या. बदल्यांमध्ये दुजाभाव होत असल्याबाबत आक्षेप घेत काही अधिकाऱ्यांनी चक्क गैरसोयीच्या बदल्यांविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यात उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची जळगाव जिल्ह्णात पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली असता त्यांची बदली स्थगित करण्याचे आदेश देऊन त्यांची बदली नाशिकलाच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्यात जमिनी भूसंपादनाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रांत उदय किसवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांचीही नाशिकला बदली होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांची दिंडोरी प्रांत म्हणून बदली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)