पुलासाठी तरतूद दीड कोटी आणि खर्च मात्र ३२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:52 AM2019-08-29T00:52:51+5:302019-08-29T00:53:17+5:30
गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
नाशिक : गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि आता तर ३२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवकांना अंदाजपत्रकीय तरतुदीइतकाच खर्च करण्यासाठी परवानगी असल्याचे सांगितले जात असताना या पुलासाठीच मात्र प्रशासनाचा नियमाला अपवाद का असा प्रश्न सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांनी केला आहे.
गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यावरून सध्या महापालिकेत रामायण सुरू असून, त्याच अनुषंगाने गायकवाड यांनी आयुक्तांना पत्र देऊन विरोध केला आहे. विशेष म्हणजे गोदावरी नदीवरील एक पूल आपल्या प्रभागात असून, वाद मात्र भलतेच करीत आहेत, असा गायकवाड यांचा दावा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार ज्याठिकाणी ३० टक्के नागरिक राहात नाही अशाठिकाणी रस्ते, पाणी, लाईट आणि अन्य सुविधा दिल्या जात नाहीत. मग, गोदावरी नदीच्या पल्याड कोणीच नसताना हा खर्च कशासाठी केला जात आहे, याविषयी गायकवाड यांनी संशय व्यक्त केला आहे. मनपाच्या अंदाजपत्रकाच्या वेळीच या पुलांना विरोध करून आपण खेडे विकासासाठी हा निधी खर्च करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसारच या निधीचा विनियोग व्हावा, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.