भाविकांची तहान भागविण्यासाठी चार कोटींची तरतूद
By admin | Published: June 2, 2015 12:26 AM2015-06-02T00:26:27+5:302015-06-02T00:38:14+5:30
स्थायी समितीचा निर्णय : वाहनतळावर करणार पाणीपुरवठ्याची व्यवस्था
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेकडून तब्बल चार कोटी रुपये खर्च करून मुख्य रस्त्यांवरील वाहनतळावर पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्य रस्त्यावरून शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी बाह्य व अंतर्गत वाहनतळे उभारण्याची कामे सुरू आहेत. या वाहनतळापासून भाविकांना सिंहस्थस्थळी पायी जावे लागणार असल्याने त्यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार असल्याने याबाबतचा प्रस्ताव स्थायीच्या पटलावर मांडण्यात आला. दरम्यान, आग्रारोड, आडगाव शिवार येथे उभारलेल्या बाह्य वाहनतळावर तब्बल १ कोटी ४५ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. पंचवटी विभागातील पेठरोड, मार्केट यार्ड, निलगिरी बाग, औरंगाबादरोड, आग्रारोड स्टेडिअम या मार्गाअंतर्गत वाहनतळांवर पीव्हीसी टाक्याद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाईल. त्याकरिता सुमारे एक कोटी ३९ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिंडोरीरोड बाह्य वाहनतळावरील पाणीपुरवठ्यासाठी ५४ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे, तर पेठरोड बाह्य विमानतळाकरिता ६७ लाख ६२ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याबाबतचे सर्व विषय स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर मांडले असता, सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्यास मंजुरी देण्यात आली आहे.