तीन लाखांची लाच घेताना पीएसआय एसीबीच्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:37 AM2021-10-01T01:37:51+5:302021-10-01T01:38:59+5:30
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावले जात असल्याच्या तक्रारी खूप येत असून त्याप्रकरणी कुठलेही गुन्हे दाखल केले जाऊ नये, यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संशयित महेश वामनराव शिंदे याने तक्रारदाराकडे चार लाखांची लाच मागत त्यापैकी तीन लाखांची रक्कम नाशिक रोड भागातील इसम संजय आझाद खराटे याच्यामार्फत स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दोघांना गुरुवारी (दि.३०) ताब्यात घेतले.
नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावले जात असल्याच्या तक्रारी खूप येत असून त्याप्रकरणी कुठलेही गुन्हे दाखल केले जाऊ नये, यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संशयित महेश वामनराव शिंदे याने तक्रारदाराकडे चार लाखांची लाच मागत त्यापैकी तीन लाखांची रक्कम नाशिक रोड भागातील इसम संजय आझाद खराटे याच्यामार्फत स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दोघांना गुरुवारी (दि.३०) ताब्यात घेतले. देवळाली कॅम्पमधील तक्रारदाराच्या फ्लॅटवर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सर्रासपणे बेटिंग लावले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक संशयित महेश शिंदे याने तक्रारदारास सांगितले. तक्रारदारावर याप्रकरणी कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये, यासाठी शिंदे याने त्यांच्याकडे शनिवारी (दि.२५) सुमारे चार लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून याबाबत सविस्तर माहिती व पुरावे सादर करत संशयित शिंदेविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशान्वये पथकाने सापळा रचला. तडजोडअंती तीन लाख रुपयांची लाच संशयित संजय खराटे याच्यामार्फत पीएसआय शिंदे याने गुरुवारी स्वीकारली असता पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक मीरा अदमाने,जयंत शिरसाठ, हवालदार प्रफुल्ल माळी, नितीन कराड, प्रभाकर गवळी आदींच्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात येत होती.
--इन्फो--
ग्रामीण पोलीस दलात खळबळ
स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक लाचेची रक्कम घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची वार्ता पोलीस अधीक्षक कार्यालयात येताच ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी कारवाई टाळण्यासाठी अशाप्रकारे लाचेची मागणी करुन ती रक्कम स्वीकारताना सापडल्याने ग्रामीण पोलीस दलाच्या प्रतिमाही डागाळली गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.